पन्हाळकर अनुभवताहेत इतिहासातील सिद्धी जोहरच्या वेढ्याचा थरार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

साधारण ३५९ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरने २ मार्च १६६० रोजी पन्हाळगडाला वेढा दिला होता. हा वेढा १२ जुलै १६६० रोजी छत्रपतींनी तोडला, व धोधो कोसळणाऱ्या पावसात विशाळगडाकडे प्रयाण केले. या चार महिने दहा दिवस पडलेल्या वेढ्यावेळी गडावरील मावळ्यांचे काय हाल झाले असतील, १२ जुलै १६६० रोजीच्या पावसाची तीव्रता काय असेल. या सर्व अंगावर शहारे आणणाऱ्या थरारक गोष्टीं आपण फक्त इतिहासात वाचत आलो आहोत. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव ३५९ वर्षानंतर पन्हाळ्यावरील नागरिक घेत आहेत.

आपटी (काेल्हापुर) : साधारण ३५९ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरने २ मार्च १६६० रोजी पन्हाळगडाला वेढा दिला होता. हा वेढा १२ जुलै १६६० रोजी छत्रपतींनी तोडला, व धोधो कोसळणाऱ्या पावसात विशाळगडाकडे प्रयाण केले. या चार महिने दहा दिवस पडलेल्या वेढ्यावेळी गडावरील मावळ्यांचे काय हाल झाले असतील, १२ जुलै १६६० रोजीच्या पावसाची तीव्रता काय असेल. या सर्व अंगावर शहारे आणणाऱ्या थरारक गोष्टीं आपण फक्त इतिहासात वाचत आलो आहोत. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव ३५९ वर्षानंतर पन्हाळ्यावरील नागरिक घेत आहेत.

चारी बाजूला भूस्खलन चालू आहे. या भूस्खलनाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. भूस्खलनामुळे पन्हाळ्यावर येणारा चार दरवाज्यातील मुख्य रस्ता खचल्यामुळे पन्हाळ्यावर येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली आहे. तर पायवाटांवरही कमी-अधिक प्रमाणावर दरडी पडत असल्याने त्याही हळूहळू बंद होवू लागल्या आहेत. त्यामुळे पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी ज्याप्रमाणे जीवनावशक वस्तूंचा साठा संपत आला होता. त्या प्रमाणेच आज पन्हाळ्यावर जीवनावशक वस्तूंचा साठा संपत आला आहे.

दरम्यान, गेल्या अकरा दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पन्हाळ्यावर सर्वत्र शुकशुकाट आहे. पर्यटक सोडाच शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची हजेरी तुरळक आहे. त्यामुळे पन्हाळ्यातील सर्वच व्यवहार बंद पडले आहेत. किराणामालाची दुकानेही साठा असेपर्यंतच चालू राहणार असल्याने येत्या दोन चार दिवसात बिकट परीस्थितीला सामोरे जावे लागणार यात शंका नाही.

सिद्धी जोहरचा वेढा तोडण्यासाठी छत्रपतींच्या सारखा राजा त्यांना साथ देणारे विरशिवा काशिद, नरवीर बाजीप्रभू यांच्या सारखे जीवाची पर्वा नकारणारे मावळे होते. आज त्यांची भूमिका शासन व प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय नेते यांनी पारपडणे गरजेचे आहे. हे शिवधनुष्य ही सर्व मंडळी कधी उचलणार, व गडावरील सर्व व्यवहार पुर्ववत करणार याकडे पन्हाळा वाशियांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panhalakar is experiencing the thrill of the Siddhi Johar siege in history