
जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे.
मांगले : जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. गुरव समाजातील लोक पळसाच्या पानांना ज्वारीच्या ताटाच्या चुया काढून गोल आकाराची पत्रावळी बनवत असत, घटस्थापनेवेळी गुरव लोक घरोघरी याच पत्रावळ्या पुरवत होते. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेवेळी या पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगीतून हद्दपार झाल्या आहेत.
आता कागदी - प्लॅस्टीक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची.
बहुतेक समारंभात तांब्याचे मोठे हंडे त्याला उचलण्यासाठी बांधलेली काठ्यांची शिकाळी आणि हंड्यात मिठा शिवाय शिजवून कामठी पाटीत मसाल्या शिवाय येळलेला भात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या चांदीच्या थाळीलाही लाजवणाऱ्या चवीचा असायचा. आज मात्र पत्रावळी आणि हा येळलेला भात फक्त डोळ्यासमोर आला तर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.
संपादन : प्रफुल्ल सुतार