जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पार्थ साळुंखे चमकला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 September 2019

यापुर्वी इंडियन राउंड 20 मीटर प्रकारात त्याने राष्ट्रीय विक्रमही नोंदविला आहे.

सातारा ः माद्रिद (स्पेन) येथे झालेल्या युथ वर्ल्ड अजिंक्‍यपद धनुर्विद्या स्पर्धेत येथील पार्थ सुशांत साळुंखे याने 19 वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील त्याची कामगिरी देशातील प्रथम क्रमांकाची ठरली आहे. 

पार्थची राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत खेलो इंडिया गुणवत्ता खेळाडू अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर शासनाच्या माध्यमातून औरंगाबाद येथील साई केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाले. तेथे त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी उत्तम तयारी केली होती. माद्रिद येथील स्पर्धेत त्याने जागतिक स्तरावर 19 वा क्रमांक पटकावला.

शालेय जीवनापासून त्याला धनुर्विद्या खेळाची आवड निर्माण झाली. जिल्हास्तरीय, तसेच आंतरशालेय कोल्हापूर विभागीय स्पर्धेत त्याने आपले कौशल्य सिद्ध करण्यास प्रारंभ केला, तसेच संघटनांच्या स्पर्धेतही तो चमकू लागला. पार्थने सन 2012 पासून राज्य, राष्ट्रीय आंतरशालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. इंडियन राउंड 20 मीटर प्रकारात त्याने राष्ट्रीय विक्रमही नोंदविला आहे. त्याने आतापर्यंत 15 सुवर्ण, सात रौप्य, तसेच नऊ कास्यपदकांची कमाई केली आहे.

पार्थच्या यशात शिक्षण प्रसारक संस्थेचे व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे योगदान असल्याचे त्याच्या पालकांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल त्याचे शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील, अध्यक्ष ऍड. प्रतापराव पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, स्कूल समितीच्या सौ. डुबल, सदाशिव कुंभार, संचालिका प्रतिभा चव्हाण, हेमकांची यादव, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम शिंदे आदींनी अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parth Salunkhe shines at the World Archery Championships