पार्टी वुइथ डिफरन्स ! जिल्ह्यात चिन्ह बदलणार, उमेदवार तेच 

प्रवीण जाधव
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पक्षातून सक्षम कार्यकर्ता तयार करता आला नाही, हेच कालच्या महाजनादेश यात्रेत उमेदवारांच्या घोषणांवरून स्पष्ट झाले.

सातारा : "पार्टी वुइथ डिफरन्स'चा नारा देत व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर टीका करत भारतीय जनता पक्ष 2014 मध्ये राज्यात सत्तेत आला. त्यानंतर पाच वर्षे जिल्ह्यातील त्यांच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी पक्षवाढीसाठी प्रयत्नांची शिकस्त केली; परंतु त्यांना पक्षातून सक्षम कार्यकर्ता तयार करता आला नाही, हेच कालच्या महाजनादेश यात्रेत उमेदवारांच्या घोषणांवरून स्पष्ट झाले. त्यामुळे पक्ष बदलणार; मात्र उमेदवार तेच, असे चित्र बहुतांश मतदारसंघांमध्ये दिसणार आहे. 

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल मोठ्या थाटात जिल्ह्यात आली. भाजपच्या कोणत्याही यात्रेचे झाले नाही, असे स्वागत काल पहिल्यांदा जिल्ह्यात ठिकठिकाणी झाले. मात्र, या उत्साहात पूर्वीपासून भाजपसाठी झटणाऱ्या, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र, तेवढी उत्स्फूर्तता दिसली नाही. त्याचे कारणही मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीच्या घोषणांवरून समोर आले. 

राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने सर्वच ठिकाणी पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी, आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अगदी बूथपातळीपर्यंत पक्षाची बांधणी करण्यात आली. तशी ती जिल्ह्यातही झाली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीला दखल घ्यावी लागेल किंबहुना धास्ती घ्यावी लागेल, असे संघटन जिल्ह्यात नक्कीच उभे होत होते. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील भाजपचे शिलेदार झटत होते. या सर्वांच्या कष्टाचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसूनही आले. कधी मिळाली नाहीत एवढी मते या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली. या मतांसाठी झटत मात्र भाजपच होती. विधानसभा निवडणुकीतही काही मतदारसंघांत त्याचे परिणाम दिसले असते; परंतु पक्षाला शतप्रतिशतची खूपच घाई झाल्याचे नंतरच्या निर्णयावरून दिसत आहे. त्यामुळेच पक्षबांधणी व त्यातून नेतृत्व घडविण्याच्या प्रयत्नांवर विश्‍वास नाही काय, असा प्रश्‍न भाजपसाठी गेल्या पाच वर्षांत झटणाऱ्या एका ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्याने उपस्थित केला. 

काल महाजनादेश यात्रा जिल्ह्यात आली. वाई, सातारा व कऱ्हाड याठिकाणी सभा झाल्या. सभा भाजपची पण कार्यकर्ते मूळचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे असेच काहीसे चित्र या सभेत दिसून आले. कधीकाळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा जयजयकार करणारेच भाजपचा उदोउदो करण्यात आघाडीवर होते. या कार्यकर्त्यांच्या घोळक्‍यात पक्षाचा जुना कार्यकर्ता कुठेतरी मागे पडल्याचे दिसत होते. असेच काहीसे चित्र मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिलेल्या उमेदवारांबाबतही दिसते आहे.

वाई मतदारसंघात मदन भोसलेंच्या उमेदवारीची घोषणा झाली. सातारा विधानसभेसाठी शिवेंद्रसिंहराजेंना, तर लोकसभेसाठी उदयनराजेंना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. माणमध्ये जणू जयकुमार गोरेंच्या नावावरच शिक्कमोर्तब झाले आहे. अपवाद कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले यांचा. मात्र, तेही पूर्वी राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये होते. परंतु, मागील निवडणूक त्यांनी भाजपतून लढविली होती. उर्वरित चार उमेदवारांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपसाठी झटलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समोवश नाही. त्यामुळे पक्ष बदलला; पण उमेदवार तेच, असे चित्र जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्येही जशी अस्वस्थता आहे, तशीच ती पक्षाचे वेगळेपण मानणाऱ्या मतदारांमध्येही आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party With Difference! The sign will change in the district, but candidates will be same