एसटीमधून प्रवासाला पास नाही, खासगी वाहनातून मात्र पास, हे कुठले धोरण

अजित झळके 
Saturday, 22 August 2020

आंतरजिल्हा प्रवासासाठी ऑनलाईन पास धोरणाबाबत लोकांनी आज तिव्र नाराजी व्यक्त करायला सुरवात केली आहे.

सांगली : आंतरजिल्हा प्रवासासाठी ऑनलाईन पास धोरणाबाबत लोकांनी आज तिव्र नाराजी व्यक्त करायला सुरवात केली आहे. एसटी बसमधून प्रवास करायला पास नाही आणि खासगी वाहनातून मात्र पास हवा, हे कुठले धोरण आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

देशात 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाले. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायला पाससक्ती केली. ऑनलाईन पासची मागणी करा आणि मंजुरी मिळाली तर तो दाखवून पुढे जा, असा नियम. त्यात किती गोंधळ होता, सामान्यांची किती फरफट झाली हे सर्वांनीच पाहिले. आता अनलॉकमध्ये एसटी सुरु झाल्या आहेत. हे करताना शासनाने घालून दिलेल्या नियमाने लोकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. लोकांनी त्याच अनुषंगाने एक भाबडा प्रश्‍न उपस्थित केला आहे, त्याचे उत्तर हे सरकार किंवा प्रशासन देईल का, हेच लोक विचारत आहेत. 

सरकारने एसटी बस सुरु करताना एका बसमध्ये 21 लोकांना बसता येईल, असा नियम घातला. एका आसनावर एकच प्रवासी बसेल. इथपर्यंत ठीक. या प्रवाशांना पासची गरज लागणार नाही, हेही स्वागतार्ह्य... परंतू, खरा प्रश्‍न इथून पुढचा आहे. स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी घेऊन तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर मात्र पासची गरज आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरा, त्याआधी वैद्यकीय तपासणी करून घ्या, तो फॉर्म जमा करा, मग जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याला मान्यता मिळणार. अनोळखी 21 लोकांनी एकत्र एसटीने प्रवास केला तर त्यांना पासची गरज नाही. पण, एका घरातील लोक स्वतःच्या कारने जाणार असतील तर मात्र त्यांना पास हवा, आरोग्य तपासणी करायला हवी... हे कशासाठी? राज्य शासनाने या पास सक्तीतून आता मुक्ती करावी, अशी मागण आता जोर धरू लागली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pass from private vehicle, which is the policy