प्रवासासाठी पास... एक भाबडा प्रश्‍न... कुणी उत्तर देईल का? 

अजित झळके
Friday, 21 August 2020

देशात कोरोनाची बाधा झपाट्याने पसरायला लागली आणि 24 मार्च 2020 रोजी देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायला पासची व्यवस्था जाहीर करण्यात आली.

सांगली ः देशात कोरोनाची बाधा झपाट्याने पसरायला लागली आणि 24 मार्च 2020 रोजी देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायला पासची व्यवस्था जाहीर करण्यात आली. ऑनलाईन पासची मागणी करा आणि मंजुरी मिळाली तर तो दाखवून पुढे जा, असा नियम.

त्यात किती गोंधळ होता आणि सामान्यांची किती फरफट झाली हे सर्वांनीच पाहिले. आता अनलॉक सुरु झाले आणि त्याचा पुढचा टप्पाही गाठला. त्यात एसटी सुरु झाल्या आहेत. आता हे करत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमाने लोकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. लोकांनी त्याच अनुषंगाने एक भाबडा प्रश्‍न उपस्थित केला आहे, त्याचे उत्तर हे सरकार किंवा प्रशासन देईल का, हेच लोक विचारत आहेत. 

सरकारने एसटी बस सुरु करताना एका बसमध्ये 21 लोकांना बसता येईल, असा नियम घातला आहे. एका आसनावर एकच प्रवासी बसेल. इथपर्यंत ठीक. या प्रवाशांना पासची गरज लागणार नाही, हेही स्वागतार्ह्य... परंतू, खरा प्रश्‍न इथून पुढचा आहे. स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी घेऊन तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर मात्र पासची गरज आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरा, त्याआधी वैद्यकीय तपासणी करून घ्या, तो फॉर्म जमा करा, मग जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याला मान्यता मिळणार... त्यातही शंभर प्रश्‍न आहेतच...

आता लोकांचा प्रश्‍न असा आहे, की अनोळखी 21 लोकांनी एकत्र एसटीने प्रवास केला तर त्यांना पासची गरज नाही... त्यांना आरोग्य तपासणी करण्याची गरज नाही... पण, एका घरातील लोक स्वतःच्या कारने जाणार असतील तर मात्र त्यांना पास हवा, आरोग्य तपासणी करायला हवी... हे कशासाठी? राज्य शासनाने या पास सक्तीतून आता मुक्ती करावी, अशी मागण आता जोर धरू लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pass for travel, one imp question