यष्टी पेटली पळा पळा...

दौलत झावरे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

"बस पेटली आहे,' असे कोणीतरी आरोळी ठोकत होते. चालकाने बस थांबवली. सगळे दिसेल त्या मार्गाने उड्या मारायला लागले. 

नगर : "यष्टी पेटली रे.. यष्टी पेटली' अशी आरोळी प्रवासी ठोकायला लागले. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. बस थांबताच प्रवासी सैरावैरा पळायला लागले. त्यात दोन-तिघे उलथून पडल्याने जखमी झाले. 

दशमीगव्हाण (ता. नगर) येथे सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. बीडवरून शिवाजीनगर आगाराची बस पुण्याकडे दुपारी एकच्या सुमारास मार्गस्थ झाली. संध्याकाळी पाचच्या सुमारास दशमीगव्हाण परिसरातून नगरच्या दिशेने येत असताना अचानकपणे प्रवाशांनी "बस थांबवा,' "बस थांबवा' असा आरडोआरडा सुरू केला. "बस पेटली आहे,' असे कोणीतरी आरोळी ठोकत होते. चालकाने बस थांबवली. सगळे दिसेल त्या मार्गाने उड्या मारायला लागले. 

कोणी संकटकालीन दरवाजातून उड्या घेतल्या. कोणी दरवाजातून बाहेर पडले. याच धबाडग्यात एक पुरूष व एक महिला जखमी झाले. 

बसचालकाने नेमके कारण शोधले. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की अग्निशमन उपकरणाच्या नळकांड्यातून 
पावडर व गॅस अचानकपणे बाहेर आल्यामुळे प्रवाशांचा बस पेटल्याचा समज झाला. चालकाने सर्व प्रवाशांना काही घडले नसल्याची माहिती दिली, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, घटना घडली, तेव्हा काही प्रवाशांनी नगर बसस्थानकात आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. बस स्थानकात आल्यावर काहीच घडले नसल्याचे समजल्यावर त्यांनाही हायसे वाटले. 

खडका फाट्याच्या घटनेला उजाळा 
दशमीगव्हाणमधील घटनेमुळे खडका फाटा (ता. नेवासे) येथे बस पेटल्याच्या घटनेला उजाळा मिळाला. मात्र, आज बस पेटली नव्हती तर फक्त आग आटोक्‍यात आणण्यासाठी असलेल्या यंत्रातून पावडर व गॅस बाहेर पडला होता. 

सात वाजेपर्यंत माळीवाड्यातच 
बीड-पुणे बसमध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे किरकोळ स्वरुपात दुखापत झालेले प्रवाशी मार्गस्थ होईपर्यंत बस माळीवाडा बसस्थानकात होती. जखमी प्रवाशी मार्गस्थ झाल्यानंतर बस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

चालक व वाहकाचे प्रसंगावधान 
चालक व वाहकाने घडलेल्या घटनेत प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना धीर देत सर्व परिस्थिती व्यवस्थित पणे हाताळली. त्यांच्या कामकाजावर सर्वच प्रवाशी खूश झाले होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The passenger Run away