विठ्ठल-बिरदेव यात्रा : लाखोंच्या उपस्थितीत पट्टणकोडोलीत भाकणूक

विठ्ठल-बिरदेव यात्रा : लाखोंच्या उपस्थितीत पट्टणकोडोलीत भाकणूक

पट्टणकोडोली - येथील श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत लाखो भविकांच्या उपस्थितीत यात्रेस प्रारंभ झाला. यात्रेतील फरांडेबाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा  झाला. यात्रेत भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने पट्टणकोडोली नगरीच सुवर्णमय झाली. भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम झाला. अजून चार दिवस यात्रा चालणार आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून सुमारे लाखो भविकांनी हजेरी लावली होती. आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलवारीसह प्रकाश पाटील, रणजित पाटील, गावकामगार पाटील, गावडे, कुलकर्णी, आवटे, जोशी, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाचे पंच मंडळी हे फरांडेबाबांना भेटण्यासाठी निघाले. वाजत-गाजत भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भानस मंदिर, कालेश्‍वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ आली. या गादीवर फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले.

भाकणूक अशी : 

  •     राजकारणात गोंधळ होईल.
  •     रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल.
  •     तांबड धान्य (मिरची, गूळ, हरबरा) व रस भांड (ऊस) कडक होईल.
  •     माझी सेवा कराल तर कांबळ्या खाली घेईन.
  •     सात दिवसांत पाऊस पडेल.

निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा (नानादेव वाघमोडे) दगडी गादीवरून उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य (तलवारीने पोटावर वार करत) केले. यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी विठ्ठल-बिरदेवाच्या जयघोषात फरांडेबाबांच्या अंगावर भंडाऱ्याची, खारीक-खोबरे व बाळ लोकर यांची उधळण केली. 

हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी परिसरातील इमारती, झाडे, घरांची छपरे यांचा आधार घेतला. मानाच्या शेकडो छत्र्या फिरवत भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले. यात्रा परिसरात विविध व्यावसायिक, करमणुकीचे खेळ करणारे, पाळणेवाले यांनी विद्युत रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित केले.

येथे घोंगडी कांबळ्याची दुकाने, ढोल, ढोलाच्या कड्या यांचा मोठा बाजार भरला आहे. तिबेटियन विक्रेत्यांची उबदार कपड्यांची (स्वेटर्स) दुकाने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. भंडाऱ्याचा खचच्या खच रस्त्यावर पडला होता. नारळ, भंडारा, खोबऱ्याच्या बरोबरच अनेक विविध वस्तूंची खरेदी- विक्रीमुळे मोठी उलाढाल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com