आबांच्या लेकरांना पवारांनी खरचं ओटीत घेतलं..! 

अजित झळके
Sunday, 16 August 2020

सुप्रियाताईंना पाहून तिथल्या महिलांनी एकच आवाज दिला... ताई, असं कसं झालं... आमचा आबा कुठं दिसला का? त्याला सोडून एकट्याच का आला... सोबत एक विनवणी या बायाबापड्या करत होत्या

सांगली ः अश्रूंचा बांध फुटला होता... आर. आर. आबांचं निधन झालंय, ते आता आपल्यात नाहीत, हे पटतच नव्हतं. बायाबापड्या हमसून-हमसून रडत होत्या. अंजनीच्या घराबाहेर आबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांचा गोतावळा जमला होता.

आबांचे पार्थिव मुंबईहून अंजनीला आणले गेले... आबांचे शेवटचे दर्शन घ्यायला अलोट गर्दी लोटली होती... त्या गर्दीतून वाट काढत सुप्रियाताई आबांच्या घराजवळ आल्या... सुप्रियाताईंना पाहून तिथल्या महिलांनी एकच आवाज दिला... ताई, असं कसं झालं... आमचा आबा कुठं दिसला का? त्याला सोडून एकट्याच का आला... सोबत एक विनवणी या बायाबापड्या करत होत्या, "ताई, आबांच्या पोरांना आता तुम्ही ओटीत घेतलं पाहिजे...' त्यांना आधार देत, आश्‍वस्त करत ताई म्हणाल्या, "आबा माझा भाऊ होता, ही पोरं आमचीच आहेत. तुम्ही त्यांची काळजी करू नका.' 

त्या प्रसंगाला पाच वर्षे उलटली... पवार कुटुंबाने, सुप्रियाताईंनी तो शब्द खरा केला. आबांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीत मान-सन्मान दिलाच, शिवाय एक कुटुंब म्हणून आबांचा परिवार आपला परिवार मानला. आबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्याची अनेक उदाहरणं देता येतील. आबांच्या पश्‍चात विधानसभेची पोटनिवडणूक लागली आणि उमेदवारीवरून खलबतं सुरु झाली, मात्र शरद पवार यांनी आबांची पत्नी श्रीमती सुमनताई यांना उमेदवारी घोषित करून आबा कुटुंब एकजूट राहील, याची खबरदारी घेतली. केवळ उमेदवारी दिली नाही तर ती निवडणूक सहज सोपी केली. सुमनताई आमदार झाल्या. पुढे तासगावच्या स्थानिक राजकारणात संजयकाका पाटील यांच्या गटाशी आबा गटाचा फार टोकाचा संघर्ष होऊ नये, यासाठी पवार कुटुंबाने आबांच्या कुटुंबावर सुरक्षेचा हात ठेवला. जयंत पाटील यांच्यावर या साऱ्या परिस्थितीची जबाबदारी सोपवली. 

आबांची कन्या स्मीता पाटील हिला युवती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले. हा राजकीय व्यवहार पार पाडतानाच स्मिताच्या विवाह बोलणीतही पवार कुटुंब पुढे होते. स्मीताच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे स्वागताला उभे होते. आता आबांचा चिरंजीव रोहित पाटील हा राजकारणात वाटचाल करतोय. जयंत पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात 2024 च्या विधानसभा उमेदवारीची घोषणाच करून टाकली. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदार संघातून 2024 ला रोहित पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे जयंतरावांनी जाहीर केले. आबांची भाषण शैली, लोकांना भावनारा साधेपणा, लोकांमध्ये मिसळण्याची कसब रोहितने आत्मसाद केली आहे. आज आबा हवे होते, असे राज्यातील अनेक राजकीय प्रसंग पाहता वाटत राहते. आबा नाहीत, मात्र त्यांच्या पश्‍चात आबांच्या कुटुंबाची राजकीय आणि कौटुंबिक जबाबदारी पवार कुटुंबियांना काळजीने पेलली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawar really took R. R. Patil`s children in his arms ..!