महिला एजंट पुन्हा झाल्या सक्रिय; पेन्शन स्कॅंडलप्रकरण थंड, तहसीलदार कार्यालयात वावर वाढला

महेश काशीद
Sunday, 22 November 2020

उचगाव सर्कलमधील चारही महिला एजंटांचे बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही लागेबंधे आहेत. बेळगाव सर्कलमधील पेन्शन स्कॅंडलमध्ये या अधिकाऱ्याचे नाव पुढे येत आहे. बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्याने कारवाईची कोणतीच भिती न बाळगता पुन्हा आपले काम सुरु केले आहे.

बेळगाव : पेन्शन स्कॅंडल प्रकरण थंड पडू लागल्याने आता यातील सहभागी महिला एजंट पुन्हा एकदा महसूल खात्यात सक्रीय होऊ लागल्या आहेत. परंतु, सध्या त्यांनी पेन्शनची कामे घेणे सोडले असून महसूलशी संबंधीत इतर कामावर भर दिला आहे. अधिकाऱ्यांनीच या महिलांना आता अभय दिला असल्याने सध्या महिला एजंटराज पुन्हा सुरु होऊ लागले आहे.

उचगाव सर्कलमधील चारही महिला एजंटांचे बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही लागेबंधे आहेत. बेळगाव सर्कलमधील पेन्शन स्कॅंडलमध्ये या अधिकाऱ्याचे नाव पुढे येत आहे. बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्याने कारवाईची कोणतीच भिती न बाळगता पुन्हा आपले काम सुरु केले आहे. उचगाव सर्कलमधील चारही महिला पूर्वी निवृत्त महसूल अधिकाऱ्याच्या संपर्कात होत्या.

आता या महिलांना थेट बेळगाव तहसीलदार कार्यालयाचे दरवाजे खुले करुन देण्यात आले आहेत. मध्यंतरी पेन्शन स्कॅंडलचा भांडाफोड होण्यापूर्वी या महिलांना वावर तहसीलदार कार्यालयातही वाढला होता, पण पेन्शन स्कॅंडलचा पर्दाफाश होताच महिलांशी सर्वांनी फारकत घेतली होती. आता स्थानिक पातळीवरच हे प्रकरण दडपले गेले असल्याने पुन्हा या महिला सक्रिय होऊ लागल्या आहेत.

मुळात या महिलांकडे दुसरे कोणतेही कामाचे साधन नसल्याने राजकारणात सक्रिय होऊ पाहत आहेत. त्यातूनच त्यांनी तहसीलदार कार्यालयामधील कामे करवून देत पैसा कमविण्यासह आपले नावही तालुक्‍यात प्रसिद्ध करुन ठेवले आहे. त्यामुळे या महिला एजंटांकडून काम करवून घेण्यासाठी तालुक्‍यातील अनेक गावातून लोक त्यांच्या संपर्कात येत आहेत. तहसीलमधील कामेही संबंधीत एजंटांच्या माध्यमातून लवकर होत असल्याने सध्या इतर एजंट मागे पडू लागले आहेत. पेन्शन स्कॅंडलनंतर तहसीलदार कार्यालयात येणे बंद केलेल्या महिला एजंटांनी अधिकाऱ्यांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित केला असून लवकरच या महिलांचे पुन्हा तहसीलदार कार्यालयामध्ये सर्वांना दर्शन होण्याची शक्‍यता आहे.

कारवाई केवळ फार्स

पेन्शन स्कॅंडलचा एवढा मोठा पर्दाफाश होऊनही यातून अधिकारी सहीसलामत सुटत असल्याने कारवाई नावापुरतीच ठरली आहे. त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची कारवाई केवळ फार्स ठरली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the pension scandal case cools down the women agents involved in it are now once again active in the revenue department