Vidhan Sabha 2019 लोकांनी जे ठरवायचे ते ठरवले आहे : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

त्यामुळे मला खात्री आहे, की राज्यात नक्कीच बहुजनवादी, समाजवादी व पुरोगामी विचारांच्या कॉंग्रेस आघाडीला जनता साथ देईल असे चव्हाण यांनी नमूद केले.

कऱ्हाड ः कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज आज सकाळी दाखल केला. येथील नूतन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला.

त्यावेळी लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ अप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, प्रदेश युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवास थोरात, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे, ऍड. प्रकाश चव्हाण, ऍड. अमित जाधव उपस्थित होते. 

अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार चव्हाण यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी त्यांना औक्षण करण्यात आले. त्यानंतर अकरा वाजता ते अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. 

अर्ज दाखल केल्यानंतर ते म्हणाले, ""कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून समाजवादी, पुरोगामी विचारांची ठामपणे पाठराखण केली आहे. तेव्हापासून आजअखेर मतदारसंघातील जनतेने कॉंग्रेस विचाराच्या उमेदवारास साथ दिली आहे. येथील जनता मूळ विचारापासून कधीच बाजूला जाणार नाही. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. कधीही जातीयवादी शक्तींना मतदारसंघात जनता थारा देणार नाही. मतदारसंघात कॉंग्रेसची रुजलेली पाळेमुळे या निवडणुकीत आणखी घट्ट होतील.
यंदाची निवडणूक विशिष्ट परिस्थितीत आहे. समाजात धर्मद्वेषासह जातीयता पसरवली जात आहे. ती थांबविण्याची गरज आहे. त्या प्रकाराने तरुण पिढीचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांनी जे ठरवायचे ते ठरवले आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की राज्यात नक्कीच बहुजनवादी, समाजवादी व पुरोगामी विचारांच्या कॉंग्रेस आघाडीला जनता साथ देईल ''. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People have decided what they want says Prithviraj Chavan