पुरापेक्षा पावसाची कऱ्हाडच्या नागरिकांना धास्ती

पुरापेक्षा पावसाची कऱ्हाडच्या नागरिकांना धास्ती

कऱ्हाड ः ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व महापुराने विस्कळित झालेले जनजीवन अद्याप सावरते न सावरते तोच पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीकाठासह विद्यानगरच्या नागरिकांनी पावसाचा जणू धसकाच घेतला आहे. नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या विद्यानगरला महापुरापेक्षा अतिवृष्टीत निचऱ्याअभावी साचून राहणाऱ्या पाण्याची भीती वाटते आहे. 
 

शहराचा उपनगर म्हणून विद्यानगर व परिसराची ओळख आहे. शहराच्या विस्ताराला मर्यादा आल्याने या भागातील नागरीकरण झपाट्याने वाढले. त्यामुळे अस्ताव्यस्त वाढलेल्या इमारती व नैसर्गिक नाले, मोऱ्यांवर झालेल्या अतिक्रमणांचा फटका विद्यानगरला पावसाळ्यात बसू लागला आहे. पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने अतिवृष्टीच्या काळात लोकांच्या घरांत पाणी शिरू लागले आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात विद्यानगर पाण्यात साचून राहिले. कऱ्हाड- ओगलेवाडी मार्गावर पाणी साचून राहिल्याने तीन दिवस हा मार्ग वाहतुकीस बंद होता. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात सैदापूर हद्दीतील सुमारे 20 घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. मात्र, अनेक इमारतीभोवताली पाणी साचून राहिल्याने व वाहने पाण्यात राहिल्याने झालेले नुकसान अधिक आहे. त्यामुळे पावसाचा वाढलेला जोर विद्यानगरमधील नागरिकांच्या उरात धडकी भरायला लावत आहे.


सध्या सुरू असलेल्या पावसाने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. जोरदार पाऊस होत असला तरी अधूनमधून मिळणाऱ्या उघडिपीमुळे पाणी साचून न राहता जात आहे. त्यामुळे सातत्याने जोरदार पावसाने हजेरी लावल्यास पुन्हा ऑगस्टची परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याबाबत अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तोपर्यंत विद्यानगरमधील नागरिकांची मनातील भीतीही कमी होण्याची शक्‍यता कमी आहे. 

शेतकरीही चिंतेत... 

ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने विद्यानगर जलमय झाले. जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. त्यात विद्यानगरातील पार्वतीनगर भागातील दहा तसेच ओगलेवाडी मार्गावरील सूर्या हॉटेलच्या मागील बाजूच्या आण्णा नांगरेनगरमधील दहा अशा सुमारे 20 घरांत प्रत्यक्ष पाणी गेले. त्यात संबंधितांचे फर्निचर, धान्य तसेच अन्य वस्तूंचे भिजून नुकसान झाले. त्याचे पंचनामेही प्रशासनाने केले आहेत. तर त्यावेळच्या पावसाने शेतात साचून राहिलेले पाणी अद्यापही तसेच असताना पुन्हा लावलेल्या दमदार हजेरीमुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com