esakal | अंत्यसंस्काराला गेले, अन्‌ होम क्वारंटाईन झाले 
sakal

बोलून बातमी शोधा

people went for funeral forced to be in home quarantine in Sangali

होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या कऱ्हाड तालुक्‍यातील कासारशिरंबे येथील एकाच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या वाळवा (जि. सांगली) येथील 11 जणांना आरोग्य विभागाने आज सक्तीने "होम क्वारंटाईन' केले.

अंत्यसंस्काराला गेले, अन्‌ होम क्वारंटाईन झाले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाळवा (जि. सांगली) : होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या कऱ्हाड तालुक्‍यातील कासारशिरंबे येथील एकाच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या येथील 11 जणांना आरोग्य विभागाने आज सक्तीने "होम क्वारंटाईन' केले. त्यात तीन पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. मृत व्यक्ती कोरोनाबधित असल्याच्या संशयातून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हे 11 जण तिकडे जाऊन आल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. हे सर्वजण अतिशय दाटीवाटीच्या हाळभागातील आहेत. या प्रकाराने हाळभाग कमालीचा दहशतीखाली आहे; परंतु घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

बुधवारी (ता. 15) येथील हाळभागावरील 11 जण कऱ्हाड तालुक्‍यात अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला जाऊन आले. संबंधित मृत व्यक्ती होम क्वारंटाईन केली गेली होती; मात्र ती कर्करोगाने ग्रस्त होती. तिच्यावर आधीच उपचार सुरू होते. दरम्यान, हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले. अशातच वाळवा येथील हे 11 जण तिकडे जाऊन आल्याने आधीच वातावरण तणावाचे असल्याने त्यात आणखी भर पडली. दुर्दैवाने हे 11 जण बाहेर जाऊन येण्यास वाळव्यात ग्रामपंचायतीत काम करणारा व्यक्तीच रोषाचा धनी झाला.

वास्तविक ज्याचा होम क्वारंटाईन असताना मृत्यू झाला. त्याचा आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संबंध नाही. ज्यांच्याशी तो संबंधित होता, ते सकाळीच तिकडे गेले होते, तरीही या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने स्वतंत्र वाहन भाड्याने घेऊन तिकडे लोकांना नेले. हा प्रकार समजताच हाळभागात खळबळ उडाली. काहींनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी यांनी तत्काळ या 11 जणांना घरीच बसण्याची ताकीद दिली. 

गावात आणि प्रामुख्याने हाळभागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी कमालीची खबरदारी घेतली आहे. ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासन, पोलिस रात्रंदिवस लोकांच्या हितासाठी झटत आहेत. अशा गंभीर स्थितीत हा प्रकार घडल्याने त्याची मोठी चर्चा आहे. गावात गटतट विसरून सगळे नेते एकत्र काम करीत आहेत. यापूर्वी आरोग्य केंद्राच्या कक्षेतील पाच गावांत केवळ पाच जण होम क्वारंटाईन होते. दरम्यान, या प्रकाराने घाबरून जाऊ नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. 

कारवाईची मागणी
या सगळ्या प्रकारात "महत्त्वाची' भूमिका बजावणाऱ्या "त्या' ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नेते, ग्रामस्थांनी केली आहे. 

कोरोना'ने नव्हे, कर्करोगाने मृत्यू

कऱ्हाड तालुक्‍यातील मृत व्यक्ती ही "कोरोना'ने नव्हे तर कर्करोगाने मरण पावली. त्यामुळे तसे भीतीचे कारण नाही; परंतु तरीही खबरदारी म्हणून तिकडे जाऊन आलेल्या 11 जणांना होम क्वारंटाईन केले आहे.
-  शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा 

कारवाईच्या सूचना दिल्या

संबंधित 11 जण बाहेर जाऊन आल्याने त्यांना सक्तीने होम क्वारंटाईन केले आहे. बंदी आदेश असताना ते तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊन त्यांनी कायद्याचेही उल्लंघन केले. त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. वैभव नायकवडी, वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्र. 

loading image