लोकांच्या नजरा...गावाकडे लालपरी येणार कधी ? 

सचिन निकम   
Friday, 23 October 2020

ग्रामीण भागात गरागरा फिरणारी लालपरीची चाके गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहेत. यामुळे सामान्य लोकांची कुठेही येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गावाकडे लालपरी कधी येणार याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहे. 

लेंगरे : ग्रामीण भागात गरागरा फिरणारी लालपरीची चाके गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहेत. यामुळे सामान्य लोकांची कुठेही येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गावाकडे लालपरी कधी येणार याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहे. 

कोरोना महामारी आटोक्‍यात आणण्यासाठी शासनाने सर्व सार्वजनिक सेवा बंद केल्या होत्या. यानंतर अनलॉक करत काही सेवा सुरु केल्या. यामध्ये लांबपल्याची बससेवा सुरू केली. मात्र ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरु केलेल्या नाहीत. यामुळे आडमार्गी असणाऱ्यांना गावकऱ्यांन पायपीट करावी लागत आहे. गावात एसटी येत नसल्याने त्यांना खासगी वाहने, ऑटोरिक्षा यांचा आधार घ्यावा लागतो आहे. वयोवृद्ध लोकांना वैद्यकीय सेवा, इतर महसुली कामासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी जाताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

अनलॉक एक, दोन मुळे शहरी भागात अनेक सेवा सुरू झाल्या. मात्र ग्रामीण भागातील परिस्थितीत फारशी बदलली नाही. अतिवृष्टी, व्यवसायातील मंदी यामुळे ग्रामीण भागाचा कणा असणारे शेतकरी, व्यावसायिकांचे पुरते कंबरडे मोडले आहे. यातच भर वाहतुकीची पडली. ग्रामीण भागातून तालुक्‍यास जाण्यासाठी खासगी वाहनांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी खासगी वाहनधारक तयार होत नसल्याने वयोवृद्धांची हेळसांड होत आहे. लालपरी सुरु झाल्यास सामान्य लोकांची परवड थांबणार आहे. 

मागणी आल्यास बस सुरू 
ग्रामीण भागातील बससेवा पुर्ववत कधी होईल याविषयी आगार व्यवस्थापक अविनाश थोरात यांच्याकडे विचारणा केली असता, ज्या ग्रामपंचायती बससेवा सुरू करण्यासाठी मागणी करतील. त्या ठिकाणी बससेवा सुरू करण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे मागणी आल्यानंतर त्या गावात बससेवा सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. शाळा महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विनाशर्त सुरळीत बससेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People's eyes ... When will the red fairy come to the village?