‘रेडझोन’वरून कोल्हापूर पालिकेविरोधात याचिका; राजारामपुरी मंडळांचा निर्णय

‘रेडझोन’वरून कोल्हापूर पालिकेविरोधात याचिका; राजारामपुरी मंडळांचा निर्णय

कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराला जबाबदार असणाऱ्या अलमट्टी धरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणि कोल्हापूर शहरातील नदीपात्रालगतच्या ब्ल्यू लाईन आणि रेडझोनमधल्या बांधकामास परवानगी देणाऱ्या महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा ठराव संयुक्त राजारामपुरी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत घेतला.

तसेच, गणेशोत्सवातून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचाही ठराव मंजूर केला. राजारामपुरी येथील कोरगावकर हॉलमध्ये बैठक झाली. संयुक्त राजारामपुरीतर्फे पूरग्रस्तांसाठी एक लाखाची मदत देणगी देण्याचा आणि संयुक्त राजारामपुरी या नावाने एक स्वतंत्र बॅनर तयार करण्याचा निर्णय या वेळी झाला. कमलाकर जगदाळे यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. 

महापुरामुळे कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यावर मोठी आपत्ती कोसळली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातून जास्तीत जास्त मदत पूरग्रस्तांना द्यावी, तसेच  शहरातील पुराला रेडझोनमध्ये भराव टाकून केलेली बांधकामे महापुराला जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि त्यासाठी नागरिकांतून दबाव निर्माण व्हावा, असे मत जगदाळे यांनी मांडले.

प्रा. अनिल घाटगे म्हणाले, की कोल्हापूरने आयआरबीच्या विरोधात जसे आंदोलन केले, त्याच धर्तीवर या रेडझोनमधील बांधकामासंदर्भात तसेच ब्ल्यू लाईनमध्ये गडबड करणाऱ्यांविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे.
ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, की यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात १३०० ते १४०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अलमट्टी हेही महापुराला कारणीभूत असेल, मात्र शहरातील पुरास नदीलगतची बांधकामेही जबाबदार आहेत.

१९८९, २००५ आणि २०१९ या पुरांमध्ये खूप मोठे अंतर आहे. त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. सुदैवाने छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्यामुळे राजारामपुरी ही जरी पुराच्या दृष्टीने सुरक्षित असली तरीही संपूर्ण शहरासाठी म्हणून राजारामपुरीतील मंडळांनी पुढे यावे. हरित लवादाकडे यापूर्वीही एक खटला दाखल आहे. पण, मी या पूररेषेतील बांधकामांना आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

संयुक्त राजारामपुरीने याला बळ द्यायचे आहे. तसा ठराव या सभेत मंजूर करावा, अशी मागणी इंदुलकर यांनी केली. या कार्यातही राजारामपुरी एक वेगळा आदर्श निर्माण करेल. तसेच, रेडझोनमधील बांधकामाबाबतही ॲड. इंदुलकर याचिका दाखल करणार आहेत. त्यासंदर्भातही आवश्‍यकत ते बळ आम्ही त्यांना देणार आहोत. त्यानुसार सभागृहातील सर्वांनी याला एकमुखी पाठिंबा दिला. या वेळी काकासाहेब पाटील, महेश उत्तुरे, विनायक सूर्यवंशी, माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे, काका जाधव, रामा पसारे, राजू लिंग्रस, विजय घाटगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com