आटपाडीत कोरोना रुग्णांनीच गैरसोयीचे फोटो काढून केले व्हायरल

नागेश गायकवाड 
Tuesday, 28 July 2020

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील वस्तीगृहावर सुरू केलेले कोरोना केअर सेंटर सेवासुविधा अभावी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना मरण यातना देणारे ठरले आहे.

आटपाडी : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील वस्तीगृहावर सुरू केलेले कोरोना केअर सेंटर सेवासुविधा अभावी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना मरण यातना देणारे ठरले आहे. याबाबत थेट सेंटरमधील रुग्णानी गैरसोयीचे फोटो काढून बाहेर व्हायरल करून तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या सुविधांकडे लक्ष द्यावे अशी, त्यांची मागणी आहे. 

आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना लगत शासकीय वसतीगृह आहे. या वसतीगृहात कोरोना केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष चालू केले आहे. सध्या या केअर सेंटर मध्ये 32 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर 37 विलगीकरण कक्षात वास्तव्यास आहेत. या केअर सेंटरवर रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्यास मनाई आहे. केअर सेंटर मधील रुग्ण आणि विलीकरण कक्षातील लोकांना सेवा-सुविधा उपचार, स्वच्छता याची खबरदारी महसूल विभाग आरोग्य विभाग यांच्याकडे विभागून दिली आहे. येथील रुग्णांची जेवण, पाणी, स्वच्छता बाबतीत प्रचंड हेळसांड चालू आहे. याबाबत अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. तसेच आत मधील फोटो काढून बाहेर व्हायरल केले आहेत. 

रुग्णांना दिले जाणारे जेवण भाज्या आणि चपाती कच्चे दिले. गरम पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. पावसामुळे संपूर्ण परिसर दलदल झाला आहे. रुग्णांना दिले जाणारे जेवण प्लॅस्टिक पिशवीतून दिले जाते. जेवणासाठी ताटांची सोय नाही. रुग्णांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जेवण करावे लागते. तेही कच्चे असते. स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. वस्तीगृहाच्या अधिक्षकाकडे स्वच्छतेची जबाबदारी आहे मात्र चार चार दिवस स्वच्छता केली जात नाही. कोणीही तिकडे फिरकत नाही. उपचार करणाऱ्या डॉक्‍टर पैकी एक जण कोरणा बाधित रुग्ण आढळला आहे. अन्य तिघे जण उपचार करतात मात्र, या रुग्णांच्या सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. 

येथील कोरोना केअर सेंटर मधील गैरसोयींबाबत दोन दिवसापासून तक्रारी आल्या आहेत. यासंबंधी तहसीलदारांच्याकडे प्रश्न मांडला आहे. 
- वृषाली पाटील, सरपंच, आटपाडी. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: photo taken by the patient in Atpadi went viral