रस्ता होत नसल्याने ओझर्डे वासियांची पायपीट 

विजय लोहार
Wednesday, 23 December 2020

ओझर्डे (ता. वाळवा) येथील महादेव मंदिर ते खेडकर व तोडकर मळ्यापर्यंत जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता असून नसल्यासारखा आहे.

नेर्ले : ओझर्डे (ता. वाळवा) येथील महादेव मंदिर ते खेडकर व तोडकर मळ्यापर्यंत जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता असून नसल्यासारखा आहे. 1955 ला ओझर्डे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून 33 फूट रुंदीचा व दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर आजपर्यंत डांबरीकरण झालेले नाही.

मार्च 2014 मध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांच्या फंडातून या रस्त्यावर खडीकरण झाले होते. या रस्त्याला लागून असलेल्या 70 ते 80 लोकांची कुटुंबे, शेतकरी व महिलांचे हाल होत आहेत. 

गावातील महादेव मंदिर ते खेडकर तोडकर मळ्यापर्यंतचा रस्ता आज तागायत दुर्लक्षित राहिला आहे. ऊसतोड व भाजीपालासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. कारण रस्ता नाही, ट्रॅक्‍टर चालक नकार देतात. रस्त्यालगत खेडकर, तोडकर, गाडीवान, लाडेगावकर, रेटरेकर, धनवडे, नेर्लेकर, मगदूम, महाडिक, लोहार, धनगर, पाटील, कांदेकर, खोत, सुतार, वशिकर, या विविध वस्त्या वसलेल्या आहेत. या 250 लोकांना गावाकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने यातूनच मार्ग काढण्याशिवायपर्याय नाही. या रस्त्यावर विजेचे खांब टाकलेले आहेत परंतु त्यावर दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे अजूनही या वस्त्या अंधारात आहेत. 

या रस्त्याबाबत आजपर्यंत कोणत्याच सरपंचांनी लक्ष दिले नाही. आता ओझर्डे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मंगलताई पाटील व त्यांचे पती उद्योजक दिनकरराव पाटील यांचे ओझर्डेसाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या काळातच हा रस्ता व्हावा, अशी आमची भावना आहे. 
- प्रवीण पाटील, नागरिक, ओझर्डे (ता. वाळवा, जि. सांगली)

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pipeline of Ozarde residents as there is no road