सांगलीतील खेळाडू इनडोअर गेम्स सुरू होण्याच्या प्रतिक्षेत 

घनश्‍याम नवाथे 
Friday, 25 September 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू केलेल्या "लॉकडाउन' प्रक्रियेला सहा महिने अर्थातच अर्धे वर्ष झाले. सध्या "अनलॉक'ची प्रक्रिया सुरू असून बऱ्याच गोष्टींना शिथिलता दिली आहे. 

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू केलेल्या "लॉकडाउन' प्रक्रियेला सहा महिने अर्थातच अर्धे वर्ष झाले. सध्या "अनलॉक'ची प्रक्रिया सुरू असून बऱ्याच गोष्टींना शिथिलता दिली आहे. परंतू इनडोअर खेळातील बॅडमिंटन, टेबल टेनिससह जीम, फिटनेससेंटरमध्ये सराव करणाऱ्यांना जिल्ह्यातील हजारो खेळाडू व प्रशिक्षक सहा महिन्यापासून प्रतिक्षेत आहेत. केंद्राने परवानगी दिली आहे. शेजारील राज्यात इनडोअर खेळ सुरू असून महाराष्ट्रातच का बंदी असा प्रश्‍न विचारला जातोय. 

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर 24 मार्चपासून "लॉकडाउन' प्रक्रिया जाहीर केली. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर गोष्टींना बंदी घालण्यात आली. शाळा, कॉलेजबरोबर खेळांवरही बंदी आली. लॉकडाउन प्रक्रिया शिथील करताना अनेक गोष्टींना सवलत दिली. सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. उद्योगधंदे, कारखाने सुरू आहेत. एसटी बसेसची जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा तसेच आंतरराज्य वाहतूक देखील सुरू झाली आहे. बाजार समित्या, फळमार्केट सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र गर्दी दिसू लागली आहे. 

अनेक गोष्टीत शिथीलता आणताना केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी इनडोअर खेळांना परवानगी दिली. परंतू राज्य सरकारने ती नाकारली आहे. त्यामुळे आज सहा महिने उलटले तरी जीम, फिटनेस सेंटर बंद आहेत. जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के मालकांनी भाड्याच्या जागेत जीम उभारल्या आहेत. महिनाकाठी 25 ते 30 हजार भाडे देणे अशक्‍य बनले आहे. तसेच प्रशिक्षकांना मानधन देणे त्याहून अवघड आहे. काही जीम चालकांनी मशिनरी विकून टाकून पूर्णपणे हा व्यवसाय बंद केला आहे. 

इनडोअर खेळातील बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळ देखील बंद आहे. वास्तविक हा खेळ एकाचवेळी दोन ते चार खेळाडू खेळू शकतात. अनेक प्रशिक्षकांनी शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करत खेळ सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. परंतू आजही ती परवानगी मिळाली नाही. सध्या शालेय आणि इतर स्पर्धा होत नसल्यातरी सराव महत्वाचा आहे. खेळाडूंना सरावासाठी प्रशिक्षक ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत. परंतू त्याला मर्यादा येत आहेत. त्यामुळेच इनडोअर हॉलमधील खेळास परवानगीसाठी नुकतेच 200 प्रशिक्षकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांना विनंती केली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Players in Sangli waiting for indoor games to start