शिर्डीतील स्वच्छता मोहिमेचे पंतप्रधानांकडून कौतुक

सतीश वैजापूरकर
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

"श्रमदान समाजहितासाठी आवश्‍यक आहे. आपण सर्वांनी श्रमदान करून माझ्या वाढदिवसानिमित्त आगळी भेट दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले

शिर्डी (नगर) : "श्रमदान समाजहितासाठी आवश्‍यक आहे. आपण सर्वांनी श्रमदान करून माझ्या वाढदिवसानिमित्त आगळी भेट दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल (मंगळवारी) साईनगर रेल्वेस्थानक परिसरात रोटरी क्‍लबचे सदस्य व रेल्वेस्थानक कर्मचाऱ्यांनी दोन तास स्वच्छता मोहीम राबविली. उपस्थित प्रवासी व रिक्षाचालकांनीही त्यात सहभाग घेतला. नंतर सर्वांनी रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्याची सामूहिक शपथ घेतली. या मोहिमेत सहभागी झालेले येथील उद्योजक राजेंद्र कोते यांनी या मोहिमेची छायाचित्रे व माहिती "नमो ऍप'वर टाकली. या मोहिमेची दखल घेत, अवघ्या 15 मिनिटांत पंतप्रधान मोदी यांनी वरील शब्दांत भावना व्यक्त केल्या.

रोटरी क्‍लबचे अध्यक्ष निखिल बोरावके, सचिव नीलेश गंगवाल, डॉ. एम. वाय. देशमुख, उद्योजक विलास (आबा) कोते, डॉ. पी. जी. गुंजाळ, अभियंता शरद निमसे, अभय दुनाखे, माजीद पठाण, आकाश सोनार, दत्तात्रेय गोंदकर, सुनील कोते, गफ्फार पठाण आदींसह सुमारे शंभर सेवाभावी मंडळींनी या मोहिमेत सहभाग घेतला. स्टेशन मास्तर बी. एस. प्रसाद यांनी या मोहिमेचे नियोजन केले.

शिर्डी रोटरी क्‍लबने बहादरपूर गाव दत्तक घेतले आहे. तेथील प्राथमिक शाळेत विविध शैक्षणिक प्रकल्प सुरू केले. वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. शिर्डीतील रेल्वेस्थानकात स्वच्छतेबाबत जागृती करणारे फलक लावणार आहोत.
- निखिल बोरावके,
अध्यक्ष, रोटरी क्‍लब

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM praises Shirdi cleanliness campaign