पंतप्रधानांनी राजारामबापूंचे चरित्र अभ्यासावे : अमोल मिटकरी

धर्मवीर पाटील
Monday, 18 January 2021

लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व चरित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभ्यासावे. त्यांना देशातील शेतकऱ्यांचे हित कसे जोपासावे? याचे ज्ञान मिळेल, असा टोला आमदार अमोल मिटकरी लगावला.

इस्लामपूर (जि. सांगली) : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व चरित्र राज्याच्या कानाकोपऱ्यात, नव्या पिढीसमोर न्यायला हवे, अशी भावना आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बापूंचे चरित्र अभ्यासावे. त्यांना देशातील शेतकऱ्यांचे हित कसे जोपासावे? याचे ज्ञान मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापूंच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त ते व्याख्यानात बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, विजय पाटील, शरद लाड, मनोज शिंदे, अविनाश पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते प्रमुख उपस्थित होते. 

आमदार मिटकरी म्हणाले,""बापूंनी ज्ञानगंगा खेड्यापाड्यात नेली. लोकसंपर्काचे प्रभावी साधन म्हणून पदयात्रा काढल्या. त्यांनी मोठा विरोध असतानाही 14 महिन्यांत साखर कारखाना उभा करून नंदनवन बनवले. त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला. त्यांचे चरित्र व चारित्र्य स्वच्छ होते, विरोधकही त्यांचा आदर करीत. राज्यातील शेतकऱ्यांच्या खातेपुस्तिकेचे प्रणेते बापू आहेत. त्यांनी कारखाना कार्यस्थळावर राम मंदिर बांधून सर्व समावेशक रामाचा संदेश दिला. जयंत पाटील यांच्या रुपात व सहवासात बापूंना जाणले आहे. त्यांनी "अखंड ही चाले ज्ञानाची लढाई'या गीत गायनाने समारोप केला. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले,""विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरणनिर्मिती करण्यात अमोल मिटकरी, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे योगदान मोलाचे आहे. आम्ही एकत्रित पूर्ण राज्यात फिरलो. त्यांचे प्रत्येक भाषण ऐकत राहावेसे वाटायचे. आशय तोच, मात्र सांगण्याची ढब वेग-वेगळी असे. ते जवळचे मित्र बनले आहेत.'' 

पी. आर. पाटील म्हणाले,""लोकनेते राजारामबापू पाटील द्रष्टे नेते होते. त्यांनी साखराळेत साखर कारखाना उभारून तालुक्‍याचा सर्वांगीण विकास केला. मंत्री म्हणून काम करताना राज्याच्या प्रगतीत योगदान केले. त्यांच्या आग्रहाप्रमाणे खूजगाव धरण झाले असते, तर सांगली जिल्ह्यातील दुष्काळ संपला असता.'' 

सभापती शुभांगी पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, भरत देशमुख, छाया पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, बाळासाहेब होनमारे, दत्ताजी पाटील, नेताजीराव पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर, भीमराव पाटील, शंकरराव भोसले यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक, कामगार, अधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले. 

आम्ही बोलू लागलो तर... 

मंत्री धनंजय मुंडे हनीट्रॅप प्रकरणावर भाष्य करताना आमदार मिटकरी म्हणाले,""विरोधकांनी राजकारण करू नये. तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. बोलायला लागलो तर तुमची पळता भुई थोडी होईल. गावा-गावांत ग्रामस्थ राम-राम म्हणून स्वागत करतात. तुम्ही "जय श्रीराम' चा नारा देत दहशत कशाला पसरवीत आहात?'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM should study Rajarambapu's character: Amol Mitkari