
सांगली- जिल्ह्यात जनता कर्फ्यू न पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सोमवारपासून कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या आहेत. कारवाईनंतरही अपयश आले तर मात्र लॉकडाउनचा पर्याय स्विकारावा लागेल असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिला.
सोमवारपासून गर्दीच्या ठिकाणी पोलिस कारवाई : पालकमंत्री जयंत पाटील...जनता कर्फ्यूमध्ये अपयश आल्यास लॉकडाउनचा पर्याय
सांगली- जिल्ह्यात जनता कर्फ्यू न पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सोमवारपासून कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या आहेत. कारवाईनंतरही अपयश आले तर मात्र लॉकडाउनचा पर्याय स्विकारावा लागेल असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यानी कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी व उद्योजक यांच्यासमवेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ""जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील भाजी विक्रेते आणि बाजार यामुळे होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम महिनाभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सुरूवातीला जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे शोधून तेथे गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी कडक भूमिका स्विकारेल. जिल्ह्यात मोठ्या संख्येने रूग्ण वाढण्याचे कारण गर्दी आहे. रूग्ण वाढत असल्यामुळे प्रथम जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. परंतू जनता कर्फ्यू माझ्यासाठी नाही म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनमुळे जनजीवन विस्कळीत होईल. त्यामुळे जनता कर्फ्यूमध्ये सर्व गर्दीची ठिकाणे, बाजार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारवाई करून गर्दी थांबवली जाईल. तसेच कोरोना संसर्गाला मर्यादा आणण्याचा प्रयत्न असले. यामध्ये अपयश आलेतर लॉकडाउनचा पर्याय स्विकारावा लागेल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटना, उद्योजक यांच्याशी बोलणे झाले आहे. सर्वांनाच कडक नियम पाळण्याची विनंती आहे. त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.''
बैठकीस व्यापारी प्रतिनिधी संजय बजाज, बजरंग पाटील, अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, अप्पा कोरे, राकेश मिरजे, शेखर बजाज, दीपक पाटील, शहर शहा, जितेंद्र कुंभार, गजेंद्र कल्लोळी, विजय खोत, सतीश भोरे, सचिन पाटील, शिवाजी पाटील, संजय आरणके, प्रसाद मदभावीकर, अजित माने, प्रितेन असर, शैलेश पवार, शंभूराज काटकर, अजित सूर्यवंशी, युसूफ जमादार, रत्नाकर नांगरे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रूग्णांच्या वॉर्डला भेट देवून रूग्णांशी संवाद साधला. विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच बैठकीनंतर क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या आलेल्या 140 ऑक्सिजन बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची पाहणी केली.
कारवाईबाबत तक्रार नको-
जिल्ह्यातील गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होईल. पोलिस कारवाईबाबत नागरिकांना सावध केले आहे. त्यामुळे नंतर कारवाईबाबत तक्रार नको. नागरिकांनी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
Web Title: Police Action Crowded Places Monday Guardian Minister Jayant Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..