सोशल मिडीया प्रचारावर पोलिस, प्रशासनाची नजर; विविध ग्रुप्सकडून संदेश पोहचवण्याचे काम सुरू

सचिन निकम
Wednesday, 6 January 2021

सोशल मीडियावरील प्रचारावर पोलिस, प्रशासनाची बारीक नजर राहणार आहे. तसा इशाराच निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासनाने दिला आहे.

लेंगरे (जि. सांगली)  : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीनंतर टशन सुरू झाले आहे. "आमचा नेता लय पॉवरफुल' चा फिवर सोशल मिडीयावर सुरू आहे. संवेदनशील असणाऱ्या निवडणुकांत भाऊबंदकीचा आमना-सामना होणार असल्यामुळे तणाव वाढू नये यासाठी सोशल मीडियावरील प्रचारावर पोलिस, प्रशासनाची बारीक नजर राहणार आहे. तसा इशाराच निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासनाने दिला आहे.

उमेदवारांनी खर्च केलेली आकडेवारी डे टू डे प्रशासनाकडून आयोगाकडे सादर केली जाते. ग्रामीणसह सर्वत्र प्रचारांची रणधुमाळी सोशल मिडीयावर सुरू आहे. फेसबुकवरील पोलिंग बुथच्या सहाय्याने मतदानांची टक्केवारी काढून लेखाजोखा मांडला जात आहे. 

फेसबुकसह, हॉट्‌सऍप, इतर संकेतस्थळांवर सर्वात जास्त प्रचार होत आहे. एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्‍य असल्याने उमेदवारांची प्रचार यंत्रणेवर भर दिला आहे. सोशल मीडिया हॅंडलर्स, कार्यकर्त्यांकडून विविध ग्रुप तयार करण्यात आलेत. रोज गलाई बांधवासह ग्रामीण भागातील हजारो लोकांपर्यंत संदेश पोहचवण्याचे काम सुरू आहे. 

प्रचाराची मुदत संपल्यानंतर सभा, रॅली, पत्रकांचे वाटप आदी प्रकारचा प्रचार बंधने असले तरी सोशल मिडीयावर बंधन नसल्याने उमेदवारांनी शक्कल लढवत या यंत्रणेत कार्यकर्ते, नातेवाईकांच्या माध्यमातून "व्हॉट्‌सऍपवर प्रचाराचा धुरळा उडवणे सुरू केल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागलेय. 

निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेल विभागाला सूचना दिल्या आहेत. व्हॉट्‌सऍपवरील संदेशांची चाचपणी करणे कठीण बाब आहे. 

यंत्रणा कार्यान्वित

कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या मोबाईलमधील हॉट्‌सऍपची तपासणी करणे शक्‍य नसले तरी पोलिसांकडून सायबर सेलच्या माध्यामातून व्हॉटस्‌ऍपवर नेमक्‍या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सगळ्यावर नजर ठेवली जाणार आहे. 
- रवींद्र शेळके, पोलिस निरिक्षक 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police, administration eye on social media propaganda; Work is underway to deliver messages from various groups