पोलिस गस्त काटेकोर करण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

सांगली - शहर परिसर आणि माधवनगर येथे नुकत्याच घडलेल्या लूटमारी व चोरीच्या घटना पाहिल्या तर पोलिसांची पहाटेची गस्त शिथिल झाल्याचे जाणवते. हद्दीतील महत्त्वाचे पॉइंट सोडून अन्यत्र गस्त वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिस मित्र म्हणून प्रभागातील इच्छुक तरुणांना मदतीसाठी घेतल्यास पोलिसांवरील ताण निश्‍चित कमी होईल. 

सांगली - शहर परिसर आणि माधवनगर येथे नुकत्याच घडलेल्या लूटमारी व चोरीच्या घटना पाहिल्या तर पोलिसांची पहाटेची गस्त शिथिल झाल्याचे जाणवते. हद्दीतील महत्त्वाचे पॉइंट सोडून अन्यत्र गस्त वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिस मित्र म्हणून प्रभागातील इच्छुक तरुणांना मदतीसाठी घेतल्यास पोलिसांवरील ताण निश्‍चित कमी होईल. 

सांगलीत मागील आठवड्यात चाकूच्या धाकाने पहाटेच्या सुमारास नागरिकांना लुटण्याचे सहा प्रकार घडले. यामध्ये दोघेजण जखमी झाले. अगदी अंत्यविधीवरून जातानाही लुटण्याचा प्रकार घडला. सांगलीत आठवडाभर हे प्रकार घडत असताना पोलिसांची पहाटेची गस्त शिथिल पडल्याचे जाणवले. सांगलीत प्रकारानंतर माधवनगर येथेही रात्रीत आठ दुकाने फोडून किरकोळ रोकड लंपास केल्याचे प्रकार घडले. तसेच चाकूच्या धाकाने तिघांना लुटल्याचे ऐकण्यात आले. सांगली आणि माधवनगरात चोरीचे प्रकार घडून गेल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजरोसपणे चोऱ्याचे प्रकार घडल्यामुळे पोलिसांची पहाटेची झोपच उडाली. तसेच त्यांच्यापुढे प्रभावी गस्त घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांची गस्त प्रभावी आणि काटेकोर व्हावी म्हणून काही महिन्यांपूर्वी त्यांना गस्तीच्या पॉईंटवर फोटो काढून तो व्हॉटस्‌ॲपवरून नियंत्रण कक्षाकडे पाठवण्याचे सक्तीचे केले. त्यामुळे गस्तीवर एक प्रकारे नियंत्रण राहिले. परंतु सध्या यामध्ये शिथिलता आली आहे. पोलिस ठाणे स्तरावर अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा तरी रात्रीची गस्त घालण्याची ड्युटी येते. हद्दीतील ठराविक पॉईंटवरून गाडी पोलिस ठाण्यात आली की गस्त पूर्ण होते.

हिवाळ्यात प्रतिवर्षी चोऱ्यांचे प्रकार घडतात. त्यामुळे या काळात अधिक प्रभावी गस्त घालणे आवश्‍यक बनते. पोलिस ठाण्यात रात्रीच्या गस्तीला असलेले पोलिस हद्दीत सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. बऱ्याचदा उपनगरापर्यंत पोलिस पोहोचत नाहीत. त्यामुळे उपनगरात बंद घरे, बंगले फोडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी हद्दीतील तरुणांना गस्त घालण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. संबंधित गल्लीत किंवा परिसरात गस्तीसाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे, पत्ते गोळा करून त्यांच्या मदतीने गस्त घातली गेल्यास पोलिसांना मदत होईल. तसेच नागरिक जागे असल्याचे पाहून चोरटेही धाडस करणार नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police bandobast