esakal | त्या ८० कामगारांचे वळवले मन...
sakal

बोलून बातमी शोधा

Police changed mind the workers of Rajasthan going by truck...

तासगाव, पलूस आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील राजस्थानचे फरशी कारागीर ट्रक मधून राजस्थानकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक ताब्यात घेऊन या 80 कामगारांचे पोलिसांनी मनपरिवर्तन करून त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था पोलिस आणि कार्यकर्त्यांनी केली.

त्या ८० कामगारांचे वळवले मन...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तासगाव : तासगाव, पलूस आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील राजस्थानचे फरशी कारागीर ट्रक मधून राजस्थानकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक ताब्यात घेऊन या 80 कामगारांचे पोलिसांनी मनपरिवर्तन करून त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था पोलिस आणि कार्यकर्त्यांनी केली. या निमित्ताने रस्त्यात फिरणाऱ्यांना प्रसाद देणाऱ्या पोलिसांचे नवे रूप समोर आले. 

तासगावात मोठ्या प्रमाणावर राजस्थानी कामगार बांधकाम व्यवसायात आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या त्यांना उपजीविका करणे मुश्‍कील झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री हे सारे कामगार बायकामुलांना घेऊन एका ट्रकमध्ये बसून जात असताना नागरिकांनी पाहिले. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला. तो पर्यंत काही सामाजिक कार्यकर्ते ही त्या ठिकाणी आले.

रात्रीची वेळ सर्वत्र अंधार ते सर्व कामगार, लहान मुले, स्त्रिया तेथेच बसलेल्या. आमच्या पोटापाण्याची सोय होत नाही आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती ते करत होते. पोलिस अधिकारी सावंत्रे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. लॉकडाऊनमुळे तुम्ही जाऊ शकणार नाही. कुठे तरी अडकून पडाल, त्यापेक्षा इथेच थांबा!

तो पर्यंत तेथे आलेल्या अनिल जाधव, नगरसेवक अभिजित माळी यांनी त्या सगळ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या अन्नधान्याची सोय करण्याची तयारी केली. अगदी राहण्याची सोय ही करण्याची तयारी दाखवली दरम्यान पोलिस निरीक्षक सावंत्रे हे त्या सर्व राजस्थानी कामगारांची समजूत काढण्यात यशस्वी झाले होते. अखेर खूप घोळानंतर ते कामगार आपल्या राहण्याच्या ठिकाणाकडे परतले. 

वास्तविक धाकदपटशा दाखवून पोलिस त्या कामगारांना हाकलून देऊ शकले असते, मात्र पोलिस पण माणूस आहेत. प्रत्येकवेळी हातातील काठी च्या उपयोगापेक्षा समुपदेशन करण्यानेही प्रश्न सुटू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.