बोंबलत फिरणाऱ्या  1700 जणांच्या ....वर रट्टे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

संचारबंदी लागू असताना अनेक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी पकडल्यानंतर यांची कारणे अत्यंत गमतीशीर असतात. तंबाखूची पुडी घ्यायला गेलो होतो, मावा संपला होता... अशी कारणे सांगितली जात आहेत. काही लोक दवाखान्यात जायचे आहे, असे सांगून दवाखान्याची जुनी फाइल घेऊन फिरतात. 
 

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने सर्व काही ठप्प आहे. मात्र, अशाही काळात विविध कामांचा बहाणा करून रस्त्यावर फिरणारे आहेतच. जिल्ह्यात रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे 1700 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून खाकीचा प्रसाद दिला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संचारबंदीचा आदेश लागू केल्यानंतर जिल्ह्यात केवळ अत्यावश्‍यक सेवा वगळता बाकी सर्व काही ठप्प ठेवण्यात आले आहे. दवाखाने, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी-विक्री होत आहे.

खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. नगर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: रस्त्यावर येऊन लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाईसुद्धा केली, तरीही लोक घाबरण्यास तयार नाहीत. अजूनही रस्त्यावर येतात. विनाकारण रस्त्यावर आल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्‍याला सामोरे जावे लागत आहे. नगर शहरात आतापर्यंत एक हजार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे सातशे लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 

उठाबशा आणि बेडूक उड्या 
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिस कारवाई करून वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करतात. कुणाला उठाबशा काढायला लावणे, बेडूक उड्या मारायला लावणे, अशी शिक्षा पोलिस देत आहेत. 

गमतीशीर कारणे 
संचारबंदी लागू असताना अनेक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी पकडल्यानंतर यांची कारणे अत्यंत गमतीशीर असतात. तंबाखूची पुडी घ्यायला गेलो होतो, मावा संपला होता... अशी कारणे सांगितली जात आहेत. काही लोक दवाखान्यात जायचे आहे, असे सांगून दवाखान्याची जुनी फाइल घेऊन फिरतात. 

नगर शहरात आतापर्यंत सुमारे एक हजार जणांविरुद्ध कारवाई केली आहे. कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी घरात बसावे. बाहेर पडल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. 
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक, नगर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police crackdown on one thousand seven hundred people who turned around