पोलिसांना आपत्ती सेवा पदक; गृहमंत्री अनिल देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शासनाकडून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझरसह पीपीई कीट

सांगली : कोरोनाचे संकट वाढत असताना रात्रंदिवस कार्यरत राहत संसर्गाची भिती असतानाही पोलिसांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच आपत्ती सेवा पदकाने पोलिसांना गौरविण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. देशमुख म्हणाले,""केवळ राज्यातच नव्हेतर संपूर्ण जगात कोरोनामुळे नवे संकट उभे राहिले. अशा संकटाच्या काळातही व संसर्गाची भिती असतानाही राज्यातील पोलिस दलाने चांगली कामगिरी केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीत महसूल, आरोग्य यांच्यासह पोलिस दलाचेही मोठे योगदान आहे. तीन महिन्यांपासून कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही यासाठी पोलिस रात्रंदिवस बंदोबस्तावर आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमणही आटोक्‍यात असलेतरी यापुढे अधिक सतर्क राहणे आवश्‍यक आहे. कोरोनाच्या या संकटाच्या कालावधीत पोलिसांनी केलेल्या कामामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावित आहे.'' 

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,""जिल्ह्यातील कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रभावी काम केले आहे. जिल्हा सीमांवर केलेल्या कडक बंदोबस्तांमुळे रूग्णांची संख्या आटोक्‍यात असून सर्व यंत्रणांबरोबरच पोलिसांचे विशेष कौतुक आहे.'' 
पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,""शासनाकडून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझरसह पीपीई कीट देण्यात आले. कोरोना संकट काळात सांगली पोलिस दलाने 24 तास सेवा बजावली. जिल्ह्यातील सर्व सीमांवर खडा पहारा पोलिसांनी दिला. यात जिल्ह्यातील एकाही पोलिसांस कोरोनाची लागण झाली नाही. यापुढेही अशी सेवा बजावतील.''  जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले, उपाधीक्षक संदीपसिंह गिल, अशोक वीरकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 

डॉ. परमशेट्टींसह 
डॉक्‍टरांनाचाही सन्मान 

कोरोना काळात पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्यात पुढाकार घेणारे डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. रणजीत चिडगुपकर, डॉ. सूर्यकांत वावळ, डॉ. विकास पाटील यांचाही सन्मान गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी लॉकडाउनकाळात पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली होती. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Disaster Service Medal; Home Minister Anil Deshmukh