धक्कादायक ; लोकांनी भरलेला कंटेनर पोलिसांनी घेतला ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती जत तालुक्यात कडेकोट नाकाबंदी केली आहे.  जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जत व उमदी  पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले आहेत. तालुक्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

जत(जि. सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच धर्तीवर जत शहरातही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. मात्र, गुजरात राज्यातील सुरत येथून कर्नाटकातील हुबळी - धारवाडच्या दिशेने निघालेला कंटेनर जत पोलिसांनी नाका बंदी वेळी पकडला. शनिवारी सायंकाळी 6  वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समजताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. 

एका नामांकित खासगी कंपनीतील 25 ते 30 वयोगटाचे 61 ड्रायव्हर एकात्र कंटेनरमधून प्रवास करत होते. जत पोलिसांनी हा कंटेनर ताब्यात घेतला आहे. 

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती जत तालुक्यात कडेकोट नाकाबंदी केली आहे.  जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जत व उमदी  पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले आहेत. तालुक्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी कर्नाटकातील हुबळी येथील पद्मा ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्र. के. ए. 43 - 4672) पोलिसांनी जत शहरात अडवला. यावेळी ट्रकमध्ये पोलिसांना काहीतरी माल वाहतूक असेल असे वाटले.  परंतू, यात चक्क 61 प्रवासी मिळून आले आहेत,  ते सगळे लोक सुरत येथून कर्नाटककडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी गाडी ताब्यात घेत यातील प्रवाशांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर देशातील एका नामांकित वाहतूक कंपनीत आपण कामाला आहे. आम्ही सगळे सुरतहून कर्नाटककडे जात आहोत. सर्वजण चालक असल्याचे सांगण्यात आले. 

पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या सगळ्या लोकांचे जबाब म्हणून घेऊन त्यांचे नाव, गाव,  दूरध्वनी क्रमांक,  पत्ते यांच्या नोंदी घेतल्या,  तसेच तहसील, प्रशासन आणि आरोग्य विभाग विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती सांगली प्रशासनास कळविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police seized the container full of people in sangli jat