पोलिस सक्त, लागतेय शिस्त; जनता कर्फ्यूचे नवे धोरण, पोलिस उतरले रस्त्यावर

शैलेश पेटकर
Tuesday, 15 September 2020

सांगली कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पहिल्या चार दिवसांत आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने पोलिसच आता रस्त्यावर उतरले आहेत.

सांगली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पहिल्या चार दिवसांत आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने पोलिसच आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सक्त भूमिका घेतल्याने बाजारपेठेला शिस्त लागते आहे. आज दिवसभर बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त होती. विनामास्क फिरणाऱ्यांसह कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात होता. पुढील टप्प्यात ही मोहीम आणखीनच व्यापक प्रमाणावर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोरोनाची संख्या आता प्रतिदिन हजाराच्या घरात गेली आहे. जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा समूह संसर्ग रोखण्यासाठी 11 ते 20 सप्टेंबरअखेर जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते; मात्र व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे कर्फ्यूला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यासाठी आता पोलिस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून कारवाई केली जात आहे. 

आजपासून गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी गस्ती पथके तैनात केली आहेत. तसेच शहरातील आणि जिल्ह्यातील मुख्य चौकात नाकेबंदी करून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच सकाळपासून मारुती रोड, कापड पेठ, मेन रोड, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभट रोड परिसरांत सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांनाही हटवण्यात आले. लाखोचा दंड पोलिसांनी वसूल केला. महापालिकेच्या पथकानेही कारवाई केली. त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी दुपारनंतर शुकशुकाट दिसून आला. 

भाजी मंडई उठवली 
शहरातील भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिकेच्या पथकाने सकाळच्या टप्प्यात भाजी विक्रेत्यांना जागेवरून उठवले. त्यामुळे दुपारनंतर शिवाजी मंडई परिसरात शुकशुकाट दिसून आला. अतिक्रमण विभागाचे सहायक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने बालाजी चौक, शिवाजी मंडई, रिसाला रोड, चांदणी चौक, विश्रामबाग गणपती मंदिर, शंभर फुटी रोड, 80 फुटी रोड, मंगळवार बाजार या ठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना आजपासून तेथे बसण्यास मनाई केली. 

प्रशासनास सहकार्य करण्याची गरज

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीच आता पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, बाजारात गर्दी करू नये. गर्दी टाळण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कारवाई केली जात आहे. नागरिकांनी आता प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. 
- मनीषा दुबुले, अप्पर पोलिस अधीक्षक, सांगली. 
 

वस्तू जप्त करणार

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे बाजारात गर्दी होऊ नये आणि संसर्ग टाळावा यासाठी आठवडा बाजार, रस्त्यावर बसून फळे, भाजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे विक्रेते आढळून आल्यास त्यांच्या वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. आजपासून ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे भाजी, फळे विक्रेत्यांनी प्रशासनास सहकार्य करावे. 
- नितीन कापडणीस, आयुक्त महापालिका

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police strict for discipline in public curfew of Sangali