
सोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची ड्यूटी... रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत नाही. अशा ताण-तणावाने पोलिसांचे रोजचं जगणंच व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांमधील आजार :
उच्च रक्तदाब
ही आहेत कारणे :
- अतिस्थूलता
- आहारातील अनियमितता
- अतिचिंता
- कामातील अतिव्यवस्था
- अतिरिक्त धूम्रपान व मद्यपान
हे आहेत उपाय :
- वजन कमी करणे
- योग्य व चौकस आहार घेणे
- तळलेले पदार्थ, जंकफूड खाणे टाळणे
- रोज किमान अर्धा तास चालणे
- योगासने करणे
- किमान सहा ते सात तास शांत झोप घेणे
- मेडिटेशन
मधुमेह
लक्षणे :
- खूप भूक लागणे
- वारंवार लघवी होणे
- खूप तहान लागणे
- अकारण थकवा येणे
- वजन कमी होणे
- हातापायास मुंग्या येणे
- जखमा लवकर भरून न येणे
- दृष्टिदोषाचा त्रास होणे
- मूत्रपिंड व मुुत्राशयाचे विकार
ही घ्यावी दक्षता :
- नियमित व्यायाम
- नियंत्रित आहार
- उंचीच्या प्रमाणात वजनावर नियंत्रण ठेवणे
- मद्यपान, धूम्रपान पूर्णपणे टाळणे
- वयाच्या 40 वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी
- लवकर निदान व नियमित उपचार आवश्यक.
मूळव्याध
ही आहेत कारणे -
- कामाचा ताण
- अवेळी जेवण
- सततचे जागरण
- फास्टफूड, तेलकट आणि तिखट खाणे
- अनियमित शौचाची वेळ
- व्यायामाचा अभाव
असा येतो ताण
- अपुऱ्या वेतनामुळे आर्थिक ओढाताण
- घरी वेळ देता येत नाही
- पत्नी आणि मुला-मुलींकडे दुर्लक्ष
- परिणामी सतत कौटुंबिक वाद
उच्च रक्तदाब या विकाराची सुरवातीला काही लक्षणे दिसत नाहीत. आजार वाढत गेला की डोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड होणे, छातीत धडधडणे, भरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे. छातीत दुखणे, अकारण चिडचिड होणे, सतत अस्वस्थ वाटणे, निदान झाले की कायमस्वरूपी औषधोपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तो होऊच नये म्हणून प्रयत्न आवश्यक आहेत. योग्य उपचारांसोबतच संतुलित आहार, निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, योग, ध्यानधारणा, मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे. पोलिसांनी एखादा तरी छंद जोपासावा. मनाला शांती देणारे संगीत ऐकणे, कुटुंबासाठी वेळ देणे, नियमित आरोग्य तपासणी व उपचार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. उमा झाड, वैद्यकीय अधिकारी, पोलिस रुग्णालय
पोलिस संख्याबळ कमी
सोलापूर शहरात दोन हजार तर जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा स्ट्रेंथ आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाख तर शहराची लोकसंख्या 12 लाखांच्या घरात आहे. साधारण एक हजार 200 ते एक हजार 500 नागरिकांमागे एक पोलिस असे सरासरी प्रमाण आहे. वाढती गुन्हेगारी, वाहतूक, उत्सव बंदोबस्त यातच पोलिसांची ड्यूटी संपते. सण, उत्सव काळात पोलिसांना 14 ते 16 तास बंदोबस्त द्यावा लागतो.
आरोग्य जपायला हवे
प्रत्येकालाच कामाचा ताण आहेच. पोलिसांनी महिन्यातून किंवा दोन महिन्यांतून आरोग्य तपासणी करून घ्यावी. यातून जे आजार समोर येतील त्यावर उपाययोजना करता येतील. औषधोपचार सुरू राहिल्यास आरोग्यावर परिणाम होणार नाही. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना आजारासंबंधी कल्पना दिल्यास त्यानुसार ड्यूटी मिळेल. संवाद ठेवणे आवश्यक आहे. पोलिसांना तीन पाळ्यांत म्हणजे आठ तास देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. आहे त्या परिस्थितीत उपाय शोधून काम करता येणे शक्य आहे.
सण, उत्सव आणि बंदोबस्त
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, रमजान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मोहरम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती, मार्कंडेय रथोत्सव, सिद्धेश्वर गड्डा यात्रा, जिल्ह्यातील ग्रामयात्रा, व्हीआयपी बंदोबस्त, निवडणूक बंदोबस्त, विविध समाजाच्या मिरवणुका असे सरासरी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी बंदोबस्तात जातो.
"सकाळ'चा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी "सकाळ' गेल्या काही वर्षांपासून तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबवीत आहे. "सकाळ'च्या माध्यमातून समाजातल्या विविध घटकांकडून पोलिसांविषयी स्नेह व्यक्त केला जात आहे.
चला व्यायाम करूया
तत्कालीन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या पुढाकारातून पोलिस आयुक्तालय, पोलिस मुख्यालयासह पोलिस वसाहतींमध्ये ओपन जीम सुरू करण्यात आली आहे. अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय ओपन जीममध्ये जाऊन व्यायाम करताना दिसून येतात. व्यायामासाठी वेळ नाही म्हणणाऱ्या पोलिसांनी जरा स्वत:च्या आरोग्याचा विचार करावा आणि व्यायामाला सुरवात करावी.
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाच्या व्यापातून स्वतःसाठी व परिवारासाठी वेळ द्यायला हवा. अचानक काम लागणार आहे याची मानसिक तयारी ठेवल्यास मनावरील ताण आपोआप दूर होईल. चाळिशीनंतर आरोग्याची तपासणी नियमित करायला हवी. सुटी आणि रजेसाठी अडवणूक होत असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा. पोलिसांकरिता कुटुंबासह सहलीला जाण्यासाठी योजना आहे. त्याचा लाभ घ्यावा.
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाचा योग्य वापर करून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गरज नसताना पोलिसांना बंदोबस्तात अडकावून ठेवू नये. सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणीही समजून घ्याव्यात. त्यांचे मानसिक खच्चीकरण थांबविण्यासाठी पुढे यावे. विशेष म्हणजे, चांगल्या कामाचे कौतुक करायला हवे. वरिष्ठ अधिकारी खंबीर असतील तर पोलिस कर्मचारी ताठ मानेने कर्तव्य पार पाडतात. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी आपल्या पातळीवर शक्य ते प्रयत्न करावेत.
- दीपक जतकर, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त
बारा तासांपेक्षा अधिक ड्यूटी, अवेळी जेवण यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडले आहे. बहुतांश पोलिस तणावाखाली असतात. वरिष्ठ अधिकारी मर्जीतल्या कर्मचाऱ्याला सवलत देतात. पोलिसांनी सुटीच्या दिवशी मुले व परिवारासोबत वेळ घालवावा. पर्यटनस्थळला भेटी देऊन मनावरील ताण कमी करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायामासाठी वेळ आवश्यक काढायला हवा.
- अनिल पोरे, निवृत्त सहायक फौजदार
हे कराच..
-प्रत्येक कामाचे नियोजन करा
-सुटीच्या दिवशी परिवाराला वेळ द्या
-आहार, व्यायाम, ध्यानधारणा नियमित करा
-संगीत ऐकत रहा, चित्रपट पहा. चांगली पुस्तके वाचा.
-सकारात्मक विचार करा, शांत मनाने काम करा
-वरिष्ठ पोलिस अधिकारी, सहकारी यांच्यात संवाद ठेवा
चर्चा ताण-तणावाची
एखाद्या पोलिसाने नैराश्यातून वरिष्ठांवर गोळी झाडली किंवा आत्महत्या केली, की ताण-तणावाची चर्चा सुरू होते. काही दिवसांनंतर ती विरूनही जाते; परंतु पोलिसांवरील सततच्या तणावामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी राज्य सरकार काहीच उपाय करताना दिसत नाही. गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "ऑन ड्यूटी.. 24 तास' राबणाऱ्या पोलिसांकडे लक्ष देऊन पोलिसांचे शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांवरही ताण
पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या दर्जांच्या पोलिस अधिकाऱ्यांचीही अवस्था फारशी वेगळी नाही. हद्दीत सोनसाखळी, मंगळसूत्र चोरी, मारामारी, खून, दरोडा किंवा साधी चोरीची घटना झाली तरी टेन्शन. नाकाबंदी, पोलिस गस्त आणि बंदोबस्त वेगळाच. त्यात वरिष्ठांकडून कारवाईची सतत टांगती तलवार. पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांची आढावा बैठक, क्राईम मीटिंग, टी मीटिंग यामध्ये अधिकाऱ्यांचा बराच वेळ जातो. दूर बदली होण्याची मनात धास्ती. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. गुन्ह्यांचा तपास कधी करणार आणि कुटुंबाला वेळ कधी देणार? या उत्तर नसलेल्या प्रश्नाने अधिकारीही गोंधळून गेले आहेत.
एक संपत नाही, तोच दुसरा तपास
कायद्यात कडक नियम, शिक्षा नसल्याने गुन्हेगारांना पोलिसांची भीती नाही. काम न करता लोकांना लुबाडून खाण्याची प्रवृतीही वाढतच आहे. त्यामुळेच गुन्हेगारी कमी न होता वरचेवर वाढतच आहे. एका गुन्ह्याच्या तपासाला सुरवात होत नाही, तोच दुसरा गुन्हा घडतो आणि तपासाची जबाबदारी येऊन पडते. यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. वरिष्ठांकडून विचारणा होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य द्यावे लागते.
आमचंही थोडं ऐका
- आमच्या वरिष्ठांना त्यांच्या वरिष्ठांकडून बोलणी खावी लागली, की त्याचा राग आमच्यावर निघतो.
- वरिष्ठांवर कामाचा ताण आला, की तो आमच्यावर येऊन पडतो.
- एखादे काम अपेक्षेप्रमाणे झाले नाही, तर त्याच्या शिव्या खाव्या लागतात.
- मर्जी सांभाळण्यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांची वैयक्तिक कामे आम्हाला करावी लागतात.
- मिळणाऱ्या वेतनामध्ये घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबीयांसह स्वत:च्या आरोग्यासाठी खर्च करताना येतात अडचणी.
- साप्ताहिक सुटीला काही ना काही अडवे येतेच. रजेसाठी विनवण्या कराव्या लागतात.
- दररोज 12 तास ड्यूटी असते. ही वेळ वाढत 14 ते 15 तासांपर्यंत जाते.
- पोलिसांची ड्यूटी तीन शिफ्टमध्ये झाली पाहिजे. ती आठ तासांची केल्यास चांगले परिणाम दिसून येतील.
- इतर सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांना आठ तास ड्यूटी आणि पोलिस खात्यात 12 तास. त्यात वेतन कमी. पोलिसांवरच अन्याय का?
- सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना समान वागणूक द्या.
- कारण नसताना बंदोबस्तामध्ये अडकावून ठेवू नका.
- विनंतीचा विचार करून रजा मंजूर करा.
हे थांबायला हवे
- राजकीय दबावामुळे अन्याय
- वरिष्ठांचा राग कनिष्ठांवर
- वेळेवर सुटी न मिळणे
- कर्मचाऱ्यांना तुच्छ वागणूक
- जास्त वेळ राबवून घेणे
- अव्यवहार्य "टार्गेट'
निवृत्त पोलिस सांगतात...
- वरिष्ठांनी सांगितलेले एखादे काम येत नसेल तर वरिष्ठांकडून समजून घ्या, परंतु कामचुकारपणा नको.
- एकदा काम चुकारपणाची सवय लागली, की अडचणी वाढतच जातात.
- व्यसनापासून चार हात लांबच राहा.
- पगाराशिवाय मिळणाऱ्या पैशांनी समाधान मिळत नाही.
- अन्याय झालेल्यांना मदत करा.
हे विसरू नका..
- कामाचा ताण घ्यायचा नाही. तणाव बाजूला ठेवा आणि कामाला लागा.
- काम "एन्जॉय' केल्यास तणाव येणार नाही.
- प्रामाणिकपणे काम केल्यास घाबरण्याची गरज नाही.
- नोकरी मिळत नाही म्हणून पोलिस दलात दाखल झालो. त्यामुळे कष्टाची तयारी ठेवावी लागणारच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.