esakal | निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना समर्थकांचे पक्षीय लेबल; पक्ष, चिन्ह विरहित निवडणुका
sakal

बोलून बातमी शोधा

political Parties labels of supporters of local leaders in elections; Party, symbolless elections

जिल्ह्यात अनेक ठिकाणी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येवून काम करतानाचे चित्र आहे.

निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना समर्थकांचे पक्षीय लेबल; पक्ष, चिन्ह विरहित निवडणुका

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली ः ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष काम आणि निवडणुक लढवत असले तरी राजकीय पक्षांची चिन्हे निवडणुकीत प्रत्यक्ष नसतात. स्थानिक पातळ्यांवर पक्ष विरहित निवडणूक असली तरी सबंधित स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना पक्षीय लेबल हे मिळते. अगदीच अपवादात्मक परस्थितीत एखाद्या पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी सर्व पक्षीय लोक एकत्र येतात. अशा गावातच ग्रामपंचायतीवर विशिष्ट पक्षाचा शिक्का मारता येत नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येवून काम करतानाचे चित्र आहे.

मिनी मंत्रालय ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहेत. 
कोरोना साथीमुळे सहा महिन्यांहून अधिक काळ जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठीची शेवटची मुदत सोमवारी ( ता. 4) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आहे. अपक्ष उमेदवारांना अनेक नेते आणि पॅनेलला ऑक्‍सिजनवर ठेवले आहे. ताकदीच्या उमेदवारांच्या माघारीसाठी गाव पातळीवर जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहेत. माघारीसाठी साम, दाम, दंड यांसह सबंधितांच्या दबाबही आणला जातो आहे. त्यातूनही न जुमानणाऱ्या उमेदवारांसाठी पॅनेलमध्ये घेवून किंवा अन्य संस्थांमध्ये राजकीय तडजोडी सुरु झालेल्या आहेत. 

तासगाव तालुक्‍यात सर्वाधिक 39 ग्रामपंचायती, जतमध्ये 30 तर मिरजेतील 22 ग्रामपंचायतसह अन्य तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांसाठी निवडणूक लागल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसमोर भाजपला गड राखण्याचे आव्हान आहे. निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, कॉंग्रेसचे विशाल पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांतही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावपातळीवर सत्ता ताब्यात राहावी, यासाठीही निवडणुका जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीने तयारी सुरु ठेवली आहे. ग्रामपंचायतीला थेट निधी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तेथील सत्ता महत्त्वाची असल्याचे ओळखले आहे. याआधीही पक्षाला याची जाणीव होती; परंतू त्यासाठी सत्तेचे जे पाठबळ लागते ते नव्हते. शिवसेना भाजपपेक्षाही ग्रामीण भागात कॉंग्रेस-राष्ट्रवादी रुजल्याने अनेक ठिकाणी त्यांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य दिसून येतात. ही उणीव भरून काढण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. 

उत्सुकता.... 
येत्या सव्वा वर्षात झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणूका आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाची ताकद पणाला लावलेली आहे. तासगावमध्ये सर्वाधिक 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने भाजपचे खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यापाठोपाठ जतमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत विरुद्ध भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात सामना रंगेल. मिरज तालुक्‍यात पश्‍चिम भागात पालकमंत्री जयंत पाटील तर उर्वरित ठिकाणी आमदार सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे यांच्या कडून जोरदार प्रयत्न होणार आहे. खानापूर मध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर विरुद्ध राष्ट्रवादीचे सदाशिवराव पाटील व भाजपचे राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटात रंगतदार निवडणूक होईल. पलूस-कडेगाव मतदार संघात आमदार अरुणआण्णा लाड व विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या संग्रामसिंह देशमुख कोणती रणनीती आखणार याची उत्सुकता आहे.

संपादन : युवराज यादव