'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर

विशाल पाटील
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

राज्यातील सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. विकासकामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपूरावा करावा लागणार आहे. 

सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत. 

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती. 

सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे.

हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत. 

लक्ष अध्यक्ष निवडीकडे 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

"महाविकास'मुळे एक पारडे जड 

झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State