इथल्या राजकारणात होणार धिंगाणा ः असं करू की तसं करू... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

प्रभाग सहा अच्या निकालामुळे महापालिकेत शिवसेनेकडे 23, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 19, भाजपकडे 15, कॉंग्रेसकडे 5, बसपकडे चार, सपाकडे एक तर अपक्ष एक नगरसेवक आहेत.

नगर ः महापालिकेच्या प्रभाग 6 अ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्या. त्यामुळे महापालिकेच्या पक्षीय बलाबलात बदल झाला आहे. याचा परिणाम स्थायी समितीतील नवीन सदस्य निवडीवर होणार आहे. स्थायी समितीतील सदस्य निवडीसाठी जुने गट नोंदणी झालेले पक्षीय बलाबल गृहीत धरायचे की नवीन पक्षीय बलाबल गृहीत धरायचे असा तिढा महापालिकेत निर्माण झाला आहे. नाही तरी प्रशासनाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची इथल्या राजकारणाची परंपरा आहे. त्यामुळे आता कसं करू, तसं करू असा पेच प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांत निर्माण झाला आहे. 

हा खेळ आकड्यांचा

प्रभाग सहा अच्या निकालामुळे महापालिकेत शिवसेनेकडे 23, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 19, भाजपकडे 15, कॉंग्रेसकडे 5, बसपकडे चार, सपाकडे एक तर अपक्ष एक नगरसेवक आहेत. या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीत शिवसेनेची एक सदस्य कमी तर भाजपचा एक सदस्य वाढत आहे. म्हणजेच कॉंग्रेसकडे 1, शिवसेनेकडे 5, राष्ट्रवादीकडे 5, भाजपकडे 4 तर बसपकडे एक सदस्य राहण्याची शक्‍यता आहे.

स्थायीच्या पायी

स्थायी समितीचे नुकतेच आठ सदस्य निवृत्त झाले. यात कॉंग्रेसचा 1, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 3 तर भाजपचा एक सदस्य निवृत्त झाला. आता स्थायी समितीत पुन्हा आठ नवीन सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी गटनोंदणी झालेले जुनी नगरसेवक संख्या धरायची की पोटनिवडणूक झाल्यानंतरची नवीन सदस्य संख्या ग्राह्य धरायची हा प्रश्‍न उभा राहिला आहे. भाजपला आता यासाठी नवीन गट नोंदणी करता येणे शक्‍य आहे का? असा नवा प्रशासकीय पेच महापालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे. 

एक जास्तच
प्रत्येक पक्षाचे निवृत्त झाले तेवढेच सदस्य पुन्हा स्थायी समितीत पाठवायचे की भाजपने एक जास्त तर शिवसेनेने एक कमी सदस्य स्थायी समितीत पाठवायचा असा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics of the ahmednagar city will be complicated