राजकारणात प्रत्येकाला आपण आर. आर. व्हावे असे वाटतं !

रवींद्र माने  
Monday, 17 August 2020

राजकीयक्षेत्रात काम करताना आबांशिवाय एकही असे नाव समोर येत नाही की ज्याच्यावर महाराष्ट्राने इतके प्रेम केले. राजकारणात प्रत्येकाला आपण महाराष्ट्राचा आर आर व्हावे असे वाटतं !

तासगाव  : राजकीयक्षेत्रात काम करताना आबांशिवाय एकही असे नाव समोर येत नाही की ज्याच्यावर महाराष्ट्राने इतके प्रेम केले. राजकारणात प्रत्येकाला आपण महाराष्ट्राचा आर आर व्हावे असे वाटतं ! अशा आबांचा वारस म्हणून म्हणून काम करणे हीच मोठी जबाबदारी आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह मुलाखत घेताना भावना व्यक्त केल्या. 

खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह आहेत. फेसबुकवर तर त्या सतत नवनवीन कल्पना राबवत असतात. आज फेसबुक लाईव्ह करत दिवंगत नेते आर आर आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आणि आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांची आबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली. मुलाखत घेताना त्यांनी आबांचे अनेक पैलू समोर आणत आर आर आबांच्या आठवणी जागविल्या. एक तासाची ही लाईव्ह मुलाखत 96 हजार नेटिझन्सनी पाहिली तर तेराशे जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुलाखत झाल्यानंतर अनेकजण लिंक सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसत होते. आर आर आबा हयात असताना मीडिया फेव्हरिट होतेच. निधनानंतर ही आज सोशल मीडियावर तितकेच लोकप्रिय आहेत हे दिसून आले. 

आर. आर. आबाना समाजात काम करताना सगळ्यांनी पाहिले पण ते आपल्या कुटुंबात कसे होते ? एक मुलगा, एक पती एक पिता म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली का ? कुटुंबाला किती वेळ देत होते ? आबांचा मुलगा म्हणून रोहित कशी जबाबदारी पार पाडतो ? हे आज त्यांनी या मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न केला. आबांवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना शेवटच्या क्षणी त्या उपस्थित होत्या तो प्रसंग सांगताना , आजही लिलावतीसमोरून जाताना वर पाहिले की आबा आठवतात असे म्हणून त्या गहिवरल्या. या मुलाखतीतून आबांच्या स्वभावाचे अनेक पैलू त्यांनी समोर आणले. अनेकदा अनेक प्रसंगात आज आबा असायला पाहिजे होते, असे आम्हाला वाटतं. अशी टिप्पणी करताना, आबांच्या घरी जन्मला येणे सोपी गोष्ट आहे. पण तो "वारसा" पुढे नेणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याचा वडीलधारा उपदेशही त्यांनी रोहित ला दिला. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 सांगली 

 सांगली 

 सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In politics, everyone has to pay Rs. R. I think so!