विरंगुळ्यासाठीच्या नाना-नानी पार्कवरून खेळाचे राजकारण 

नागेश गायकवाड 
Tuesday, 11 August 2020

आटपाडी : येथील ग्रामपंचायतीने वयोवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी उभारलेल्या नाना-नानी पार्क मधील खेळाचे साहित्य शासकीय नियम डावलून खरेदी केल्याची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर यांनी केली आहे.

आटपाडी : येथील ग्रामपंचायतीने वयोवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी उभारलेल्या नाना-नानी पार्क मधील खेळाचे साहित्य शासकीय नियम डावलून खरेदी केल्याची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर यांनी केली आहे. तर सरपंच वृषाली पाटील यांनी 14 व्या वित्त आयोगातून शासकीय जीएम पोर्टलवरून खेळाचे साहित्य खरेदी केले असून विकासकामांना खीळ घालण्याचे काम उपसरपंचांकडून केला जात असल्याचा आरोप केला आहे. ग्रामपंचायतीत सरंपच हे शिवसेनेचे तर उपसरपंच भाजपचे आहे. 

उपसरपंच कोळेकर यांच्या तक्रारीनंतर गटविकास अधिकारी शेळके यांनी माऊली, संभाजीनगर उद्यान व चैतन्य नगर गार्डन येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सदरचे साहित्य घेऊन जाण्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला. 

लहान मुले आणि वृद्धांसाठी व्यायामाचे साहित्य आणि गार्डन उभारावे अशी आटपाडीकरांची पंचवीस वर्षापासूनची मागणी होती. ग्रामसभेतही मागणी केली होती. त्याप्रमाणे नाना-नानी पार्क उभे करण्यासाठी ठराव मंजूर घेतले होते. सरपंच सौ. पाटील यांनी शासकीय जीएम पोर्टलवरून वरील ठिकाणी तसेच शाळेसाठीही खेळाचे साहित्य खरेदी केले. सदरचे साहित्य नाना-नानी पार्क मध्ये बसवले तर जिल्हा परिषद शाळेत कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खरेदी केलेले साहित्य बसवलेले नाही. असे असताना चौकशीची मागणी करून विकासकामांना खेळ घातल्याचा आरोप सरपंच सौ. पाटील यांनी केला आहे. आमदार अनिल बाबर आणि तानाजी पाटील, ऍड. धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या अनेक कामांचा धडाका पाहून राजकीय द्वेषापोटी वरिष्ठांकडे लेखी तक्रारी करून विकासकामांना खीळ घालण्याचे काम केले जात असल्याचे सरपंच सौ. पाटील यांनी म्हटले आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics of the game from Nana-Nani Park for leisure