पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकूही!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने माण तालुक्‍यात विकासाची गंगा वाहत आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक फक्त ताकदीने लढणारच नसून सर्वच्या सर्व जागा जिंकणार आहोत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने माण तालुक्‍यात विकासाची गंगा वाहत आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक फक्त ताकदीने लढणारच नसून सर्वच्या सर्व जागा जिंकणार आहोत.

आमदार जयकुमार गोरे याच्या धाडसी, आक्रमक व कुशल नेतृत्वाखाली तालुक्‍यात काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरू आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तळागाळातील माणसांपर्यंत काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे पोचली आहेत. काँग्रेसकडे आज ज्येष्ठांसह तरुणांची मोठी फळी कार्यरत आहे. मागील पंचवार्षिकमध्ये चिठ्ठीवर राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता गेली; पण आता पंचायत समितीचे सभापतिपद काँग्रेसच्या ताब्यात आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार गोरे यांच्या माध्यमातून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. उरमोडीचे पाणी तालुक्‍यात खळाळले असून, जिहे- कटापूरसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. साखळी सिमेंट बंधाऱ्यांमुळे अनेक गावांचा कायापालट झाला असून, शेतशिवारे हिरवीगार झाली आहेत. गावागावांत मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळे विकासाचा हा रथ असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आमदार गोरे ज्या उमेदवारांना संधी देतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पदाधिकारी व कार्यकर्ते निष्ठेने पार पाडतील. सध्या तालुक्‍यात इतर पक्षांची स्थिती पाहता काँग्रेसला चांगली संधी आहे. या संधीचे सोने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोणत्याही परिस्थितीत पंचायत समितीवर काँग्रेसचीच सत्ता येईल.

आमदार जयकुमार गोरे म्हणतील ते धोरण अन्‌ बांधतील ते तोरण असा काँग्रेसचा कारभार आहे. त्यामुळे पक्षात मतभेद वा धुसफूस नाही. गद्दारांनाही थारा नाही. 
- अर्जुन काळे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

मतदारांच्या विश्‍वासावर यश मिळवू

येणारी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मतदारांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर ताकदीने लढविणार आहे. 

युवा नेते शेखर गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. संदीप पोळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, मनोज पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, माजी सभापती श्रीराम पाटील, माजी उपसभापती वसंतराव जगताप, वाघोजीराव पोळ, सूर्याजीराव जगदाळे आदींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरू आहे. मिशन पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या पाच जागा निवडून आणण्याचे ध्येय समोर ठेवून प्रयत्न सुरू आहेत.

उमेदवारीसाठी पक्षाच्या सामान्य; परंतु निष्ठावंत कार्यकर्त्याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. तालुक्‍यात राष्ट्रवादीच्या विविध नेतेमंडळींच्या विकास निधीतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली असून, माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या विकास निधीतून गावागावांत हायमास्ट पोल, पिकअप शेड, ‘जिल्हा नियोजन’मधून रस्ते, बंधारे आदी विकासकामे केली आहेत. प्रभाकर घार्गे यांनी त्यांचा सर्वात जास्त विकासनिधी हा माण तालुक्‍यासाठी दिला असून, माणगंगा नदीवर व गावागावांत बंधाऱ्याची साखळी उभी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अल्पकाळ मिळाला असतानाही सुभाष नरळे यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी तालुक्‍यासाठी दिला. सत्ता असतानाही आणि नसतानाही आम्ही कधीच विकासकामांच्या बाबतीत मागे राहिलो नाही.

विकासकामांच्या जोरावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून, विरोधक कोण यापेक्षा आम्हाला गट व गणांतील सर्व जागा जिंकून माण पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे.
- बाळासाहेब सावंत, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

विकासकामांच्या जोरावर रिंगणात

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माण तालुक्‍याच्या पाणीप्रश्नाचे कायम भांडवल करून निवडणुका जिंकल्या. मात्र, १९९५ मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीच्या सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने कायम दुष्काळी तालुक्‍यांना न्याय मिळावा, या उद्देशाने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापन करत जिहे- कटापूर उपसा जलसिंचन योजना साकारली; परंतु आघाडी सरकारने ही योजनादेखील रखडवली. आता या योजना कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. या कामी शिवसेनेचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री विजय शिवतारे आणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील हे ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माण तालुक्‍याला आजदेखील टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. हे आघाडी सरकारचे पाप असून, माणच्या जनसुविधेच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणेसाठी पालकमंत्र्यांनी रस्ते, वीज, स्मशानभूमी या कामांसाठी माण तालुक्‍याला मोठा निधी देऊन विकासकामे उभी केली आहेत. जलयुक्त शिवार या महायुतीच्या योजनेतून माणमध्ये नदी, तलाव, ओढे खोलीकरण, रुंदीकरण आणि सिमेंट बंधाऱ्यांची कोट्यवधींची कामे मार्गी लागली आहेत. याच विकासकामांच्या आधारावर आम्ही ही निवडणूक लढवताना जनतेला सामोरे जाणार आहोत.

माणच्या जनसुविधेच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी रस्ते, वीज, स्मशानभूमी या कामांसाठी मोठा निधी दिला आहे. याच विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ.
- संजय भोसले, तालुकाप्रमुख, शिवसेना

युतीची तयारी; अन्यथा स्वबळावर

भारतीय जनता पक्ष नव्या जोमाने उभारी घेत असून, समविचारींना सोबत घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याचा मानस आहे. तसे न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्यास आम्ही तयार आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्र बदलतोय, घडतोय. त्यामुळे सध्या सर्वत्र भाजपला चांगले वातावरण आहे. पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

माणमध्येही इतर पक्षांतील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद निश्‍चितच वाढणार असून, त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकांमध्ये होईल.

राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचा मोठा फायदा माण तालुक्‍याला झाला आहे. या योजनेतून कोट्यवधींचा निधी तालुक्‍याला मिळाला असून, त्यातून जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. माणगंगा पुनरुज्जीवन योजनेला शासनाने भरीव मदत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्‍यात सर्वच गट, गणांत आम्ही ताकदीने निवडणूक लढवू. सोबतच महायुतीतील सर्व घटक पक्षांशी युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. इतरांनाही सोबत घेण्याबाबत बोलणी सुरू आहेत. सर्वांना समान न्याय, तसेच सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वत्र असलेल्या चांगल्या वातावरणाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

या वेळची निवडणूक भाजप फक्त लढण्यासाठी लढणार नसून, जिंकण्यासाठी लढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत माण पंचायत समितीत ‘कमळ’ फुललेले दिसेल.
- बाळासाहेब मासाळ, तालुकाध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: politics in satara