सांगली जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतसाठी आज मतदान

विष्णू मोहिते
Friday, 15 January 2021

सांगली जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी उद्या (ता. 15) मतदान होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

सांगली : जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी उद्या (ता. 15) मतदान होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. 1508 जागांसाठी 2886 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून 662 केंद्रांवर मतदान सुरू होणार आहे. जिल्ह्यातील 3 लाख 43 हजार 812 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2020 कालावधीत मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यापैकी 9 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. तासगाव, जत, मिरज, खानापूर, कडेगाव, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ, शिराळा आणि वाळवा तालुक्‍यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 143 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. 551 प्रभागांतील 1 हजार 508 जागांसाठी 2 हजार 886 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायतसाठी 1 लाख 68 हजार 226 स्त्री, तर 1 लाख 73 हजार 373 पुरुष, इतर 11 असे एकूण 3 लाख 43 हजार 812 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

ग्रामपंचायतसाठी 662 मतदान केंद्रे असून 153 निवडणूक निर्णय अधिकारी, 176 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 55 क्षेत्रीय अधिकारी 757 केंद्राध्यक्ष राखीवसह आहेत. मतदान अधिकारी नंबर 1, 2 व 3 साठी प्रत्येकी 757 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिपाई 757 असून 91 बसेस, 61 जीप निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील मतदान केंद्रावर कर्मचारी आणि ईव्हीएम मशीन पाठवण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती. निवडणूक असलेल्या गावांमध्ये सायंकाळी कर्मचाऱ्यांसह मतदान यंत्र दाखल झाली. 

ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासनाकडून विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात. ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून डावपेच आखले आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय चिन्हावर लढविता येत नसली, तरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगली आहे. काही ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामनेही आहेत. 

मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त 
निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सात पोलिस उपअधीक्षक, 12 पोलिस निरीक्षक, 71 पोलिस उपनिरीक्षक, चौदाशे पोलिस कर्मचारी, याशिवाय एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

10 गावांचे आठवडा बाजार बंद 
सांगली ः जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीसाठी उद्या (ता. 15) मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्याच्या व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मतदान सुस्थितीत पार पाडण्यासाठी भरविण्यात येणारे 10 गावांतील आठवडा बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत. ते बाजार शनिवारी (ता. 16) भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. यामध्ये मिरज तालुक्‍यातील मालगाव व लिंगनूर, तासगाव तालुक्‍यातील पाडळी, विसापूर, आळते, धूळगाव व जुळेवाडी, खानापूर तालुक्‍यातील खंबाळे भाळवणी, पलूस तालुक्‍यातील रामानंदनगर व जत तालुक्‍यातील अंकले या गावांचा समावेश आहे. 

मतदान केंद्र परिसरात मनाई आदेश जारी 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदानादिवशी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदार सर्व मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास मनाई केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling for 143 gram panchayats in Sangli district today