
डाळिंबाची निर्यात केवळ दहा टक्के तर द्राक्षांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तर टक्केच होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
सांगली : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात डाळिंब व द्राक्ष कवडीमोल दराने विकावी लागली. आर्थिक परस्थितीवर मात करुन शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या हिमतीने बागा फुलवल्या. अतिवृष्टी आणि अवेळी पावसाने पुन्हा एकदा संकटे उभी राहिले. परिणामी डाळिंब व द्राक्ष निर्यातीचे क्षेत्र घटले. शेतकऱ्यांनी पीक वाचवण्याला प्राधान्य दिले. डाळिंबाची निर्यात केवळ दहा टक्के तर द्राक्षांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तर टक्केच होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
यावर्षी कोरोना साथीच्या काळातही द्राक्ष पिकांना फटका बसला होता. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांकडून निर्यात झाली. त्यांना मात्र चांगले दर मिळाल्याचे समाधानकारक चित्रही समोर आहे. द्राक्षासह बेदाणाही मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याशिवाय डाळिंब, इतर फळे, भाजीपाला निर्यातही होते. जिल्ह्यातून सन 2019-20 मध्ये युरोपियन देशात 8 हजार 484 टन, तर इतर देशांत 9 हजार 770 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत.
जिल्ह्यात निर्यातीचे सर्वाधिक क्षेत्र तासगाव आणि खानापूर तालुक्यातील आहे. मिरज तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र जास्त असूनही निर्यातक्षम द्राक्ष पिकवणाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प आहे. डाळिंबाची युरोपियन राष्ट्रांना दरवर्षी आटपाडीतून शंभर कंटेनर निर्यात होते. यंदा अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसल्याने निर्यातीचा टक्का खाली कोसळतोय.
यंदा जेमतेम दोन कंटेनरची निर्यात अपेक्षीत आहे. यंदा अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. सतत पाच महिने पाऊस कोसळत राहिला. द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान झाले. पीके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान होते. निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीही नाद सोडून बागा वाचवायला प्राधान्य दिले.
वेळ, पैसा खर्च
जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात युरोपीयन देश व इतर देशात निर्यात होते. त्यातील कीडनाशके, ऊर्वरित अंश तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 17 कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत सरकारकडून तातडीने निर्णय अपेक्षीत आहे. शेतमाल निर्यातीत जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची दर वर्षी वाढ होत आहे. सध्या ही सुविधा पुणे येथे असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांचा वेळ, पैसा खर्च होतो.
संपादन : युवराज यादव