डाळिंब दराने घेतली उसळी; किलोला इतका मिळाला दर

नागेश गायकवाड
Saturday, 5 September 2020

आटपाडी येथील बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळिंबाची आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे डाळिंब दराने मोठी उसळी घेतली.

आटपाडी (जि . सांगली) : येथील बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळिंबाची आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे डाळिंब दराने मोठी उसळी घेतली. ग्रेड एकचा भाव प्रति किलो दीडशेच्या पुढे; तर ग्रेड चारला सर्वांत कमी पन्नास रुपये दर मिळाला. 

येथील डाळिंब सौदे बाजारात आटपाडी, कवठेमंकाळ, जत, सांगोला, माळशिरस, माण, खटाव या भागातून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी आणतात. गेल्या महिन्यात डाळिंबाची रोज 100 ते 120 टन आवक होत होती. या काळात 25 ते 70 रुपये दरम्यान दर होते. मात्र गेल्या आठवड्यापासून आवक घटत चालली आहे. 50 टक्‍क्‍यांनी आवक कमी झाली आहे; तर लॉकडाउन शिथिल केल्यामुळे मोठ्या शहरांतून डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. आवक कमी आणि मागणी जादा झाल्याचा परिणाम दरावर झाला आहे. 

येथे विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची चार प्रकारात विभागणी केली जाते. पहिल्या प्रकाराला प्रतिकिलो दीडशे रुपये भाव मिळाला, तर सर्वात कमी दर्जाचा, अत्यंत लहान फळे असलेल्या चार क्रमांकाला पन्नास रुपय दर मिळाला. यामध्येही हरिओम फ्रुट सेंटरवर माळशिरस शेतकरी हणमंत गोरे यांनी विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला सर्वाधिक 157 रुपये प्रति किलो; तर ग्रेड 4 च्या डाळिंबाला 52 रुपये दर मिळाला. यावेळी हरिओम सेंटरचे मालक पांडुरंग सरगर यांनी हणमंत गोरे यांचा सत्कार केला. 

दर कायम राहतील

डाळिंब दरात प्रचंड वाढ झाली आहे.आवक कमी आणि मागणी जास्त झाल्याचा परिणाम आहे. असेच दर कायम राहतील असा अंदाज आहे. 
- पांडुरंग सरगर, संचालक, हरिओम फ्रूट सेंटर 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate rate boom at Atpadi Market