गरीब 37 मुलांना मिळाली टॅबवर ऑनलाईन शिकण्याची संधी 

जयसिंग कुंभार 
Monday, 5 October 2020

सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 37 गरीब मुलांना अद्यावत टॅबवर ऑनलाईन शिकण्याची संधी मिळाली. 

सांगली : कोविडच्या आपत्तीत जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील नित्य व्यवहार बदलले. मोबाईलला शिवू नका असं ज्या मुलांना बजावलं जायचं त्यांच्याच हाती तासन्‌तास मोबाईल आला. ऑनलाईन शिक्षण गरजेचं झालं. मात्र ज्यांच्याकडे या सुविधाच नाहीत त्या मुलाचं काय? अशा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 37 गरीब मुलांना अद्यावत टॅबवर ऑनलाईन शिकण्याची संधी मिळाली. 
शहरातील विविध शाळांत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी आकार फौंडेशनने शिष्यवृत्ती योजना राबवली. शैक्षणिक साधनांबरोबरच नित्योपयोगी वस्तू दरमहा दिल्या जातात. कोविडच्या आपत्तीत शाळेलाच टाळे. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. पण स्मार्ट मोबाईलच घरी नाही अशा मुलांनी काय करायचे? ही अडचण "आकार'च्या शिष्यवृत्तीधारक काही मुलांनाही आली. 

"आकार'च्या संचालिका उज्वला परांजपे यांनी ही अडचण योजनेच्या शिष्यवृत्तीधारक दात्यांपुढे मांडली. मुलांना किमान जुने असे काही टॅब किंवा मोबाईल देऊया अशी कल्पना त्यांनी मांडली. मात्र श्रीमती रजनी किशोर यांनी द्यायचे तर चांगलेच देऊया असे सांगता ब्रॅन्डचे नवे कोरे टॅब द्यायची तयारी दर्शवली. मग अशा नेमक्‍या गरजू मुलांचा सर्व्हे करण्यात आला.

47 मुलांना असे टॅब द्यायचं ठरलं. मग या टॅबसाठी मोबाईल इंटरनेट कनेक्‍शन, मुलांचा ईमेल आयडी असं सारं काम "आकार'चाच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सुभाष राठोड याने पुढाकार घेऊन केले. गेले महिनाभर ही मुले या टॅबचा वापर करून घरातूनच ऑनलाईन धडे गिरवत आहेत. अशा संकटप्रसंगीही त्याचं शिक्षण थांबलं नाही याचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर जसा दिसतोय तसाच हा आनंद संस्थेच्या उज्वलाताई, निशाताई यांच्या चेहऱ्यावरही दिसतोय. हा सारा आनंद रजनीताईंच्या दातृत्वामुळे फुलला त्यांना पत्रे लिहून मुलांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. इतरांना काही द्यायचा आनंद आणि त्यातून मिळालेली पोहोचपावतीच जणू ही सारी मंडळी अनुभवत आहेत. 

""आम्ही हैद्राबादचे. माझ्या वडिलांच्या नोकरीनिमित्त आठवीपर्यंत किर्लोस्करवाडी राहिले. तिथेच शिकले. सांगलीतील भारतीय समाज सेवा केंद्रातून मी दोन मुलांना दत्तक घेतलं. सांगलीशी माझं नातं असं खूप स्नेहाचं. या मुलांशी काही करताना मिळणारा आनंद बालपणीच्या आठवणींशी जोडणारा आहे.'' 
श्रीमती रजनी किशोर 
संचालक, थर्मेक्‍स, पुणे 

"" भावंड किंवा शेजारी राहणाऱ्या अशा दोन तीन मुलांमागे एका टॅबची सोय केलीय. त्यासाठी दरमहा दोनशे रुपये मोबाईल शुल्क "आकार'तर्फे दिले जातेय. अजूनही पंधरा मुलांना अशा टॅबची गरज आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीच्या धडपडीला समाजाचे बळ हवे.'' 
-उज्वला परांजपे, संचालक, आकार फौंडेशन

 

सांगली 
संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor 37 children get opportunity to learn online on tab