पॉर्नचा विळखा : ओळखायचा आणि सोडवायचा कसा?

 Pornography effect : How to recognize and solve it?
Pornography effect : How to recognize and solve it?

पॉर्नच्या आहारी गेलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केली. ग्रामीण भागातील एका कष्टकरी कुटुंबातील मुलाकडून झालेले हे कृत्य धक्कादायक. आपल्या आजूबाजूस अशा संभाव्य घटना कशा टाळता येतील. पॉर्नच्या विळख्यातून मुलांना सोडवायचे कसे? यादृष्टीने विवेचन करीत आहेत मानसोपचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार. 

मोबाईलचा मर्यादित वापर हवा ! 

मोबाईल क्रांतीमुळे पॉर्न व्हिडिओच्या विळख्यातून मुलांना वाचवणं सोपं राहिलंलं नाही. एका केसमध्ये 14 वर्षांचा मुलगा चार वर्षांच्या मुलीला असं व्हिडिओ दाखवून नको ते करत होता. आपल्या आजूबाजूलाही अशा केसेस असतील. एकल पालकत्व असलेल्या कुटुंबात किंवा आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळेही कुमार वयात मुलं कुटुंबापासून दुरावतात. त्यातून अशा घटना घडतात. मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण हवे. मुलाकडून त्याचा उपयोग कसा होतो हे पाहणे पालकांचीच जबाबदारी आहे. मोबाईल गेम्समध्ये एक गती असते. त्या खेळात हिंसकता असते. गेम्सच्या आहारी जाण्यातून विध्वंसक वृत्तीस चालना मिळते. तेच पॉर्न व्हिडिओमधून होते. आता शालेय स्तरावरच मुलांना योग्य प्रबोधन आणि वर्तन प्रशिक्षण हवे. लैंगिक शिक्षणाकडे आजही उपेक्षेने पाहिले जाते. टाळेबंदीने मुलांना सहज मोबाईल दिला त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. प्रश्‍न डोंगराऐवढे आहेत आणि त्यांना सामोरे जाण्यासाठीचे प्रयत्न आणि इच्छाशक्ती तोकडी आहे. 
- कालिदास पाटील, कार्याध्यक्ष, राज्य मानसतज्ज्ञ संघटना 

रोगट दृष्टिकोनाचे दुष्परिणाम 
मुलं पॉर्नच्या आहारी जाणं म्हणजे व्यक्तिमत्त्वातला दोष आहे. पालकांचे दुर्लक्ष, शालेय स्तरावर संवादाचा अभाव यातून हा दोष तयार होतो. कुमारवयात मुलांमध्ये हार्मोन्स बदल होतात. तेव्हा मुलं एकलकोंडी होतात. भिन्न लिंगी आकर्षण असते. त्यातून मुलं तात्पुरता रिलिफ म्हणून पॉर्नकडे वळतात. ही मुलं आक्रमक होतात. स्वतःला कोंडून घेऊन मोबाईल बघतात. मोबाईल दुसऱ्याकडे देत नाहीत. काढून घ्यायचा प्रयत्न केल्यास हिंसक होतात. यावर ठोस औषधोपचार नाही. मुलं कितपत या विळख्यात सापडली आहेत हे पाहून प्रसंगी त्यांना मनोविकार विषयक संस्थेत दाखल करावे लागते. बऱ्याचदा मुलं समुपदेशनासही तयार होत नाहीत. त्यामुळे पालक, शिक्षक यांच्याकडूनच वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शास्त्रशुद्ध समुपदेशन प्रभावी ठरतं. पॉर्नने अस्वस्थ न होता पालकांनी त्यावर उपाय शोधले पाहिजेत. आपल्या समाजाचा लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोनच रोगट आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षणाबाबत योग्य-अयोग्यच्या तिढ्यातच आपण अद्यापि अडकलो आहोत. 

- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसिक विकार तज्ज्ञ 

पाल्यावर "सोशल' वॉच हवा ! 

तंत्रज्ञानाने मानवी जगणं सुसह्य केलं आहे. ज्ञान माहितीचा सतत विस्तार केला आहे. तसंच काही प्रश्‍न उभे केले आहेत. पॉर्न व्हिडिओच्या आहारी जाणं हा त्यापैकीच एक. पॉर्नच्या विळख्यात सापडण्याआधी खूप काही घडलेलं असतं. मुलांचा सोशल मीडियावरील वावरावर लक्ष हवं. त्यातून बऱ्याच गोष्टी कळतात. तुम्ही मुलाच्या परवानगीनं फेसबुक मित्र झालात तर आपोआपच त्यावर नियंत्रण राहू शकेल. त्याच्या मित्रांच्या व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरील चर्चांचाही कधी कधी धांडोळा घ्या. त्याच्याशी सतत खुलेपणाने संवाद साधा. एकतर्फी कोणतीही कृती न करता विश्‍वासात घेऊन सारे काही करा. बऱ्याचदा पेरेंटल कंट्रोलला बगल देण्यासाठी मुलं बहुतवेळा प्रोक्‍सी सर्व्हरचा वापर करतात. वयोगटनानुसार पालकांनी या समस्येला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे गेले पाहिजे. आवश्‍यक तिथे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. 

- विनायक राजाध्यक्ष, सायबर क्राईम तज्ज्ञ 

"सोशल' व्यक्तिमत्त्व जाणून घ्या ! 
तंत्रज्ञानाच्या मदतीने आज तुमच्या मुलावर वॉच ठेवला जाऊ शकतो. मात्र त्यात धोके आहेत ते समजून घेऊन पाऊल टाकले पाहिजे. मुलाला विश्‍वासात घेऊन आणि कधी कधी त्याच्या अपरोक्षही ते करता येईल. अँड्राईड मोबाईल असेल तर गुगल माय ऍक्‍टीव्हिटी ऑप्शनमध्ये त्या मोबाईलच्या सर्व ऍक्‍टीव्हिटी कळतात. "युट्युब'चा वापर किती आणि काय पाहिले याच्या लिंक्‍स कळतात. मॅप्सला जीपीएस ऑप्शन ऑन असेल तर त्याचा संचार कळू शकतो. फेसबुकच्या ऍक्‍टीव्हिटी लॉग ऑप्शनमध्ये गेल्यास फेसबुक वापराचा सारा इतिहास तपासता येतो. खोलीत कोंडून घेऊन टीकटॉक व्हिडिओ बनवत असेल तर ते व्हिडिओ काय आहेत हे जाणून घेतले पाहिजेत. हे सारे तंत्रज्ञान पालक जाणून घेऊ शकतात. पाल्य पालकांना मोबाईल हाताळून देईलच याची शाश्‍वती नाही. त्याने जीमेलला दिलेला आयडी पासवर्ड समजला तर त्याच्या परस्पर सारे काही जाणून घेता येते. थोडक्‍यात मुलाची सोशल मीडिया वापराची कुंडली म्हणजेच समाज माध्यमीय व्यक्तिमत्त्व तपासून घेता येईल. त्यात काही चुकीचे असेल तर उपायोजनाही करता येईल. 

- दिनेश कुडचे, संगणक तज्ज्ञ 

महत्त्वाचे 

  • मोबाईल इतरांना देण्यास मुले आक्षेप घेत असतील तर ते चांगले लक्षण नाही. 
  • सोशल मीडियासह संगणकावर पाल्य काय पाहतो याची माहिती पालकांना हवी. 
  • एकांतवासात उशिरापर्यंत मुले मोबाईलमध्ये अडकून पडत असतील तर सावधान. 
  • मुलांचा सोशल मीडियातील वावर नेमका कशा स्वरुपाचा आहे पालकांना माहीत हवे. 
  • वयोगटनानुसार मुलांसाठी तज्ज्ञांचे लैंगिक शिक्षणविषयक मार्गदर्शन-प्रबोधन गरजेचे. 
  • शक्‍यतो मुलांनी इंटरनेट वापर डेस्क टॉप किंवा टीव्हीला जोडून केल्यास अधिक योग्य. 
  • नको असलेल्या लैगिंक-हिंसक साईटस्‌ पालकांनीच ब्लॉक केल्या पाहिजेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com