सोलापूर जिल्ह्याचे पालकंमत्री भरणे?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

सोलापूर जिल्ह्यातील एकाही राष्ट्रवादीच्या आमदाराला संधी न मिळाल्याने जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्‍न अद्यापही कायम आहे. शेजारच्या पुणे जिल्ह्याला अजित पवार, दिलीप वळसे- पाटील आणि दत्ता भरणे यांच्या माध्यमातून तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. भरणे हे इंदापूरचे असून इंदापूर आणि सोलापूर सीमेवरचा भाग आहे. त्यामुळे सोलापूरच्या पालकमंत्री भरणे यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे.

सोलापूर : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने सोलापूरचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात जिल्ह्याच्या बाहेरचाच पालकमंत्री होणार हे निश्‍चित मानले जात असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे दत्ता भरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : झेडपी अद्यक्षपदामुळे मोहितेंचे समाधान?
इंदापूर सीमेवरचा भाग

सोलापूर जिल्ह्यातील एकाही राष्ट्रवादीच्या आमदाराला संधी न मिळाल्याने जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्‍न अद्यापही कायम आहे. शेजारच्या पुणे जिल्ह्याला अजित पवार, दिलीप वळसे- पाटील आणि दत्ता भरणे यांच्या माध्यमातून तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. भरणे हे इंदापूरचे असून इंदापूर आणि सोलापूर सीमेवरचा भाग आहे. त्यामुळे सोलापूरच्या पालकमंत्री भरणे यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. शरद पवार, आर. आर. पाटील, दिग्विजय खानविलकर, जगन्नाथ पाटील यांच्यानंतर आता सोलापूरला या वेळी बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे. 

हेही वाचा : जयंत पाटलांनी घेतली सोलापूर झेडपीतील पराभवाची माहिती
यापैकी कोणालाच नाही संधी

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला वंचित राहावे लागले आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी एक- एक आमदार आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावरील तीन आमदार आणि अपक्ष संजय शिंदे यांचा पाठिंबा असे चार आमदार असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंत्रिमंडळात कोणालाही स्थान दिले नाही. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या निवडून आलेल्या आहेत. मंत्रिपदी भारत भालके, बबनराव शिंदे, संजय शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांची वर्णी लागेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करायचे? हा प्रश्‍न अद्यापही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कायम ठेवला असल्याचे मंत्रमंडळाच्या विस्तारातून समोर आले आहे. 

हेही वाचा : साथ सोडली... ज्यांच्यासाठी केला अट्टाहास त्यांनीच फिरवली पाठ
शिंदे उत्सुक नव्हते

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा आमदार झाले आहेत. ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर त्यांना संधी मिळेल अशी शक्‍यता होती. आमदार शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांनी मंत्रिपदासाठी फारशी उत्सुकता दाखविली नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. आमदार भालके हे राष्ट्रवादीसाठी नवखे असले तरीही पवारांसाठी जुने समर्थक म्हणून ओळखले जातात. बबनराव शिंदे नसतील तर आमदार भालके यांना संधी मिळेल अशीही शक्‍यता व्यक्त होत होती. आमदार भालके यांनाही या विस्तारात डावलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांना संधी मिळेल, अशीही शक्‍यता शेवटच्या टप्प्यात निर्माण झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of paying Solapur Guardian Minister