
बेळगाव : मिरवणूक मार्गावर ‘पोस्टर वॉर’
बेळगाव - दोन वर्षांनंतर होत असलेल्या बेळगावच्या प्रसिद्ध शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या माध्यमातून राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शहरात पोस्टर वॉर सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिवजयंती तसेच चित्ररथ मिरवणुकीसाठीचे शुभेच्छा फलक शहरभर लावले आहेत. विशेष म्हणजे यावेळी चित्ररथ मिरवणूक मार्गावर जागा मिळेल, तेथे हे शुभेच्छा फलक लावले आहेत. या शुभेच्छा फलकांवर मराठी भाषेला स्थान दिले आहे. शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत सर्व भाषिकांचा सहभाग असतोच, पण त्यात मराठी भाषिकांची संख्या जास्त असते. त्यामुळे मराठी भाषिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या फलकांच्या माध्यमातून झाला आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीच्या आधी वातावरण निर्मितीही केली जात आहे.
बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला शंभर वर्षांचा इतिहास आहे. परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते. चित्ररथ मिरवणूकही काढली जाते. शिवजयंतीच्या दिवशी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर दोन दिवसांनी चित्ररथ मिरवणूक काढली जाते. मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर धारवाड जिल्हा, महाराष्ट्र व गोव्यातूनही शिवभक्त येतात. २०२० व २०२१ साली कोरोना व लॉकडाऊनमुळे चित्ररथ मिरवणूक झाली नव्हती. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे मिरवणुकीला परवानगी आहे. आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात राजकीय नेते, विविध संघटनांचे शुभेच्छा फलक लागले आहेत. पण यंदा चित्ररथ मिरवणूक मार्गावर लावलेले फलक हा चर्चेचा विषय आहे.
चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग हा बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बेनके यांनीही शुभेच्छा फलक लावले आहेत. पण भारतीय जनता पक्षाच्या याच मतदारसंघातील इच्छुकांनीही फलक लावले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीचेही फलक
या वेळी महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनेही शहरात शुभेच्छा फलक लावले आहेत. सणासुदीच्या काळात लावल्या जाणाऱ्या शुभेच्छा फलकांवर मराठीला फारसे स्थान नसते. यावेळी मात्र मराठी भाषेला प्रथम स्थान मिळाले आहे.
Web Title: Poster War In Belgaum City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..