esakal | वारणाली येथील सांगली महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती 
sakal

बोलून बातमी शोधा

Postponement of tender process for Sangli Municipal Corporation Multispeciality Hospital at Varanasi

वारणाली येथील सांगली महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेस वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने आज स्थगिती दिली.

वारणाली येथील सांगली महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेस वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने आज स्थगिती दिली. सौ. यशश्री मारुलकर यांनी हे आदेश दिले. कुपवाड येथील हणमंत सरगर, बापूसो तोडकर, श्रीपाल कोल्हापुरे, योगेश हिंगमिरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. सचिन पाटील व ऍड. कोमल जाधव यांनी युक्तिवाद केला.

महापालिकेत कॉंग्रेस सत्तेत असताना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेला दहा आरोग्य केंद्रे आणि कुपवाडसाठी 50 बेडचे सर्वोपचार रुग्णालय मंजूर झाले. वारणालीतील महापालिकेच्या जागेत हॉस्पिटलसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी हे हॉस्पिटल कुपवाड गावठाण हद्दीत होण्याची मागणी केली. त्यामुळे जागेच्या वादात कुपवाडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी मात्र हॉस्पिटल वारणालीतील मंजूर जागेतच व्हावे असा हट्ट धरला. 

सत्ताधारी भाजपने महासभेत नव्याने जागा विकत घेऊन तेथे हॉस्पिटल उभारण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. दरम्यान, आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा ठराव विखंडित करण्यासाठी पाठवला. शासनानेही ठराव विखंडित करण्याबाबत हरकती मागवल्या होत्या. त्याची मुदत संपण्यापूर्वीच आयुक्त कापडनीस यांनी हॉस्पिटलसाठी चार कोटी  45 लाख 61 हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली.

भाजपचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी निविदा प्रक्रियेला विरोध केला होता. कुपवाडमध्ये मोठ्या संख्येने कारखाने असून तेथे हजारो कामगार काम करतात. मात्र एकही चांगले हॉस्पिटल नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल कुपवाडमध्येच व्हायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. 

हणमंत सरगर यांनी ऍड. सचिन पाटील यांच्यामार्फत दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ऍड. पाटील म्हणाले,""राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत गरीब, मजुरांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने कुपवाडमध्येच हे हॉस्पिटल मंजूर करण्यात आले होते. प्रशासनाने वारणालीसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हॉस्पिटल उभारण्याचा घाट घातल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय जागेच्या मूळ मालकाने जागा परत मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा स्थितीत त्याच जागेवर हॉस्पिटल बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. हे न्यायालयासमोर मांडण्यात आले. कुपवाडमध्ये हॉस्पिटलसाठी जागा आहे. केवळ 10 ते 12 गुंठे जागा विकत घ्यावी लागणार आहे. ती केवळ 47 लाख रुपयांना मिळणार आहे. महापालिकेचे सुमारे चार कोटी रुपये वाचणार आहेत. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या बाबी विचारात घेत न्यायालयाने वारणाली येथील हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.'' 

संपादन : युवराज यादव

loading image