काय सांगता ! कांद्या नंतर आता 'बटाटा' पण गायब...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

कांद्याचे भाव गगनाला भिडले आणि जेवणातून कांदा गायब झाला. मोठ्या आकाराच्या बटाट्याचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. परिणामी, या बटाट्यापासून निर्माण केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे.

बेळगाव - दरवर्षीच्या तुलनेत यंदा बटाटा उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आकाराच्या बटाट्याचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. परिणामी, या बटाट्यापासून निर्माण केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे. सध्या बेळगावात वेफर्सची टंचाई भासू लागली असून, शेतकऱ्यांसह बेकरी व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला. मोठ्या आकाऱ्याच्या बटाट्याला मागणी अधिक असली तरी आवकच नसल्याने खरेदीदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. 

उत्पादनात घट

बेळगाव एपीएमसीतील बटाटा आवक दरवर्षीपेक्षा ५० टक्‍क्‍यांनी घटली आहे. ऐन फळधारणेच्या काळातच ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बटाट्याच्या आकारात वाढच झाली नाही. मध्यम आणि छोटे गोळी आकाराचे बटाटा उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. मात्र, मोठ्या आकाराच्या बटाट्याला मागणी अधिक असते. त्यामुळे, या बटाट्याला दरही किमान दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत मिळतो. पण, यंदा बटाटा उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मोठ्या आकाराच्या बटाट्याचे उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे उरतात. मात्र, यंदा अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - काॅलेजला जायचं आता खादीचे कपडे घालुन -

वेफर्स व बेकरी उद्योगावर परिणाम

मोठ्या आकाऱ्याच्या बटाट्याला विविध वेफर्स कंपन्याकडून मागणी अधिक असते. त्याचबरोबर बेकऱ्यांकडूनही या बटाट्यांची उचल होत असते. मोठ्या आकाराच्या बटाट्यापासून वेफर्स केले जातात. यावरही आता परिणाम दिसून येत आहे. शहरातील दुकानामध्ये आता वेफर्स टंचाई निर्माण झाली आहे. दुकानदारांना वेफर्स का मिळत नाहीत. अशी विचारणा केली असता. मोठ्या आकाराचा बटाटा यंदा मिळत नसल्याने वेफर्स निर्माण करण्यास अडचण येत आहे. वेफर्सची मागणी अधिक वाढली आहे. पण, बटाटाच नसल्यामुळे वेफर्सचे उत्पादनही घटले आहे, असे सांगण्यात येत आहे. 

दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या बटाट्याची आवक केवळ पाच टक्के आहे. मोठ्या आकाराच्या बटाट्याला मागणी अधिक आहे. पण, हा बटाटा नसल्याने ग्राहकांना माघारी परतावे लागते. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
- हणमंत पाटील, अडत व्यापारी, एपीएमसी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potato production has declined this year.