video - कोरोनामुळे उतरला भाव अन् बहाद्दराने फुकट वाटल्या चार कोटींच्या कोंबड्या 

एम. ए. रोहिले
गुरुवार, 12 मार्च 2020

व्यावसाय अडचणीत असल्याने सर्वसामान्यांना आजवर 25 हजार कोंबड्यांचे मोफत वाटप केल्याची माहिती रायबाग येथील पोल्ट्री उद्योजक सदाशिव देशिंगे यांनी दिली.

रायबाग - कोरोना व्हायरसची धास्ती सर्व स्तरातील नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. पक्षांचा उठाव न झाल्याने आपले तब्बल 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे पण वाचा -  मध्यप्रदेशातील धक्यानंतर क्रर्नाटकात कॉंग्रेसने उचलले हे पाऊल 

व्यावसाय अडचणीत असल्याने सर्वसामान्यांना आजवर 25 हजार कोंबड्यांचे मोफत वाटप केल्याची माहिती रायबाग येथील पोल्ट्री उद्योजक सदाशिव देशिंगे यांनी दिली. ते म्हणाले,"विविध ठिकाणी आपले पोल्ट्रीफॉर्म आहेत. तेथील पक्षांची संख्या 2 लाखाच्या आसपास आहे. कोरोना व्हायरसबाबतच्या विविध अफवा पसरत असल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आठवड्याला आपले सुमारे 35 ते 40 लाखाचे नुकसान होत आहे. खरेतर चिकनमुळे कोरोनाचा धोका नाही. पण सोशल मीडियावरून त्या पार्श्‍वभूमीवर चुकीची माहिती प्रसारीत होत आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. आपल्याकडे अळगवाडी, रायबाग, भिर्डी, भेंडवाड, यमकनमर्डी याठिकाणी पोल्ट्री फॉर्म आहेत. येथील 200 कामगार नुकसानीमुळे धास्तावले आहेत. यापुढे पक्षांचा उठाव न झाल्यास मोठा तोटा सहन करावा लागणार आहे." 

हे पण वाचा - इराण मध्ये अडकलेल्यांसाठी शरद पवार आले धावून... 

कोंबड्या मिळविण्याठी एकच झुंबड
पोल्ट्री उद्योजक सदाशिव देशिंगे यांनी सर्वसामान्यांना चिकन मिळण्यासाठी रायबाग, मेकळी, ऐनापूर, भेंडवाड, जलालपूर, भिर्डीसह वीस गावात कोंबड्यांचे मोफत वाटप केले. यावेळी कोंबड्या मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. 

'कोरोनामुळे पक्षांचे दर खाली खाली येत केवळ 8 रुपयांपर्यंत आले होते. त्यामुळे कमी किंमतीत विक्री करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना लाभ होण्यासाठी परिसरातील वीस गावामध्ये 25 हजारावर कोंबड्यांचो मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतःची वाहने ज्या-त्या गावात नेली. आपले मोठे नुकसान झाले तरी सामान्य लोकांना चिकन दिल्याचे समाधान वाटते.'
-सदाशिव देशिंगे, पोल्ट्री व्यावसायिक, रायबाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poultry holders felt hunks for free in belgaum