विट्यातील यंत्रमागाची धडधड आजपासून बंद; 15 दिवस आंदोलन

दिलीप कोळी
Tuesday, 26 January 2021

सूत दरातील तेजी-मंदी, साठेबाजी, करचोरीमुळे होणारे नुकसान विचारात घेऊन सर्व यंत्रमाग आजपासून (ता.26)  पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विटा (जि. सांगली) : सूत दरातील तेजी-मंदी, साठेबाजी, करचोरीमुळे होणारे नुकसान विचारात घेऊन सर्व यंत्रमाग आजपासून (ता.26) पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 15 दिवस यंत्रमागाची धडधड थांबणार आहे. 

वायदेबाजारातील समावेशामुळे कापसाचा सुरु असलेला सट्टेबाजार, व्यापारात शुन्य व्याजाच्या प्रचंड रकमा हाती असलेल्या बलाढ्य कंपन्यांचा प्रवेश व साठेबाजी, छोट्या राष्ट्रांना दिलेली अबकारी कराची सूट व त्यातून बड्या राष्ट्राकडून होणारे करचोरीचे गैरप्रकार यासारख्या प्रश्नांमुळे विकेंद्रीत यंत्रमाग लघुउद्योग काही वर्षापासून डबघाईला आला. महिन्याभरात सूत बाजारात झालेली दीडपट दरवाढ व पाठोपाठ रोज मोठ्या प्रमाणातील दर घसरणीमुळे व्यवसायास जुगाराचे स्वरुप आले आहे.

सूत दर वाढताना कमी दराचे सूत न मिळणे, सूत दरवाढीच्या प्रमाणात कापड दरात वाढ न होणे व सूत दर कोसळल्याने थांबलेला व्यापार, घसरू लागलेले दर व वाढीव दराचे सुत यामुळे यंत्रमागधारकांना दोन्ही बाजुने नुकसान सोसावे लागत आहे. 

दीपावली दरम्यान 32 काऊंट सुताचे दर 180 रुपये किलो होते, तर कापसाचे दर स्थिर होते. अचानक सूत दरात रोज पाच - दहा रुपयांची वाढ करण्यात येऊ लागली. महिन्याभरात हे दर दीडपट वाढून 270 रुपयांपर्यंत वाढवले. कापूस दर मात्र स्थिर होते. वाढीव दराच्या तुलनेत कापडास वाढीव दराची मागणी नव्हती. तरीही रोज सूतदर वाढतच होते. हा प्रकार या साखळीतील सर्वच घटकांच्या दृष्टीने अनाकलनीय होता. तरीही ठरवून दर वाढवले जात होते. बड्या व्यापाऱ्यांनी अक्षरश: उखळ पांढरे करुन घेतले. यंत्रमागधारकांचे दिवाळे निघण्याची वेळ आली. 

चार दिवसांपासून मात्र हे हिंसक पद्धतीने वाढविलेले दर कोसळू लागले आहे. रोज पाच-दहा रुपये कमी होऊ लागल्याने संभ्रम निर्माण होऊन सुत व कापड व्यापार ठप्प झाला. या प्रकाराचा दुहेरी आर्थिक फटका बसू लागला आहे. 

सूत दर दीडपट का वाढले?

कापडास वाढीव दराची मागणी नसताना सूत दर दीडपट का वाढले ? हे षड्यंत्र नियोजनबद्धपणे कसे राबवले ? कोणत्या बड्या व्यापाऱ्यांनी नफेखोरी केली याचा केंद्रीय तपास यंत्रणेने शोध घेऊन व्यवसायास वेठीस धरणाऱ्या गैरप्रवृत्तीवर कारवाई केली पाहिजे. 

-किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power looms at Vita will be closed from today; 15 days movement