वीजपंपांना ऑटो स्वीच नको; कपॅसिटर कपॅसिटर बसवा

पोपट पाटील
Sunday, 24 January 2021

शेतीपंपांना लावलेले ऑटो स्वीच काढून त्याऐवजी कपॅसिटर बसवणे गरजेचे आहे. 

इस्लामपूर (जि. सांगली) : ऑटो स्वीचमुळे वीज आल्यावर एकाच वेळी सर्व पंप सुरू होऊन वीजभार वाढून डीपी (रोहित्र) वरील दाबही वाढत असल्याने ते जळून वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीपंपांना लावलेले ऑटो स्वीच काढून त्याऐवजी कपॅसिटर बसवणे गरजेचे आहे. 

राज्यात सुमारे 42 लाख शेतीपंपधारक शेतकरी आहेत. 'महावितरण'कडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन शेतीपंप सुरू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंपांना 'ऑटो स्वीच' लावले आहेत. त्यामुळे वीज येताच शेतीपंप आपोआप सुरू होतात. अनेक शेतीपंप असे एकाच वेळी सुरू झाल्याने डी पी (रोहित्र) वरील भार एकाचवेळी वाढतो व त्यामुळे डीपी जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे, ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते.

त्यामुळे शेतीपंपांना कपॅसिटर बसवून ऑटो स्वीचचा वापर टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. डी पी जळल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतोय. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी शेतीपंपांना कपॅसिटर बसवण्याची गरज आहे.

प्रत्येक शेतीपंपास क्षमतेनुसार कपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्‍यात आणण्यासाठी सोपा उपाय आहे. कपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा तसेच रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कपॅसिटर उपकरण महत्त्वाचे आहे. शेतीपंपास कपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात, असेही स्पष्ट केले गेले आहे. 

कपॅसिटर बसवून घ्या
"बहुतांश ग्राहकांनी शेतीपंपास कपॅसिटर बसवले नाहीत. बसवलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. ज्यांनी कपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत, तसेच कपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास तेही दुरुस्त करून घ्यावेत." 
- आर. बी. सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power pumps do not need auto switches; Fit the capacitor