महापालिकेच्या घरपोच सेवेचे  विश्‍वजीत कदम यांच्याकडून कौतुक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली-संचारबंदी असली तरी नागरिकांनी अन्नधान्याबाबतीत काळजी करु नये. कोणीही धान्यसाठा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा कृषीराज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिला. तसेच सांगली महापालिकेची घरपोच सेवा योजना कौतुकास्पद असून योजना राज्यातील महापालिकांनी त्याचे अनुकरण करावे असे आवाहनही त्यांनी केले.

सांगली-संचारबंदी असली तरी नागरिकांनी अन्नधान्याबाबतीत काळजी करु नये. कोणीही धान्यसाठा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा कृषीराज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिला. तसेच सांगली महापालिकेची घरपोच सेवा योजना कौतुकास्पद असून योजना राज्यातील महापालिकांनी त्याचे अनुकरण करावे असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा आज मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी महापालिकेतील बैठकीत घेतला. या बैठकीसाठी नगरसेवक, अधिकारी यांची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी महापौर, विरोधी पक्षनेते यांच्यासह मोजकेच अधिकारी बोलवले होते. तेथेही सामायिक अंतराचे नियोजन ठेवण्यात आले होते. बैठकीस महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेंद्र तेली, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. सुनील आंबोळे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, अमर निंबाळकर उपस्थित होते. 

मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी महापालिकेकडून संचारबंदीच्या काळात राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. आयुक्त कापडणीस यांनी नागरिकांसाठी सुरू केलेल्या आपत्कालीन योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. हा आजार संसर्गातून आणि संपर्कातून अधिक पसरत असल्याने संचारबंदी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत सर्वांनीच काळजी घेणे आवश्‍यक आहे. यावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या आवाहनानुसार कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि संचारबंदी कलमाचा भंग करू नये. 

ते म्हणाले, भारती विद्यापीठ अशा संकटात शासनाच्या आणि जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून आमच्याकडून शासन आणि जिल्हा नियोजन समितीला भरघोस निधी देण्याचे नियोजन केले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाला जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praise from Vishwajit Kadam for the home service of the municipality