
सांगली : सिंह, मोर, मगरीसह अन्य वन्यप्राणी प्रतापसिंह उद्यानाची शान होती. महापुरानंतर इथल्या वन्यजीवांचे स्थलांतर झाले आणि सांगलीचे वैभव संपले. गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पक्षी संग्रहालयाची संकल्पना पुढे आणली. तिला मूर्त रूप आले असून आतापर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. पक्ष्यांचे पिंजरे, जाळ्या पूर्ण झाल्या आहेत. दिवाळीआधी हे काम पूर्ण होणार असून सांगलीकरांसाठी हे संग्रहालय खुले होईल. मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणांहून अडीचशेंवर पक्षी येथे आणले जाणार आहेत.