esakal | संवेदनशील आणि सजग पप्पा...
sakal

बोलून बातमी शोधा

pratik patil son of jayant patil express her feelings on her father

आम्ही घरी एकत्र असताना राजकारणावर अपवादाने चर्चा होतात. सध्या काय सुरू आहे, काय केले पाहिजे, आजच्या दिवसाचे काय नियोजन आहे याविषयी ते चौकशी करतात. आठवड्यात तीन ते चार दिवसातून एकदा मी पप्पा आणि राजवर्धन एकत्र येतो तेव्हाही फार राजकीय विषय होत नाहीत.

संवेदनशील आणि सजग पप्पा...

sakal_logo
By
प्रतीक जयंत पाटील

   राज्यात एकदम हायटेक, धडाडीची वाटणारी, मोठे राजकीय वलय असणारी व्यक्ती म्हणून पप्पांचा दबदबा असला तरी ते एक नॉर्मल व्यक्ती आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला साजेसे, सरळ आणि साधी राहणी त्यांना आवडते. पण ते लोकांच्या प्रश्नांविषयी अत्यंत सजग व संवेदनशील असतात. आमच्या कौटुंबिक वातावरणात साधेपणाला महत्त्व देणारे पप्पा नेहमी साधेच राहतात. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आम्हाला नेहमी प्रेरणा देते. 

आम्ही घरी एकत्र असताना राजकारणावर अपवादाने चर्चा होतात. सध्या काय सुरू आहे, काय केले पाहिजे, आजच्या दिवसाचे काय नियोजन आहे याविषयी ते चौकशी करतात. आठवड्यात तीन ते चार दिवसातून एकदा मी पप्पा आणि राजवर्धन एकत्र येतो तेव्हाही फार राजकीय विषय होत नाहीत. चांगला सिनेमा, बाहेर कॉफी घ्यायला किंवा जेवायला जाणे, एखाद्या वेळी चांगला मूड असेल तर सिनेमा पाहायला जाण्याविषयीदेखील बोलणे होते. त्यांना इंग्रजी व  हिंदी भाषेतील ऍक्शन मुव्हीज पाहायला आवडतात. कधीकधी खास ड्राइव्हला जाणेही त्यांना मनापासून आवडते. घरी असताना सकाळी उठल्यावर व्यायाम, पेपर वाचणे, टीव्हीवरील बातम्या पाहणे आणि कुटुंबियांशी गप्पा मारणे याला ते प्राधान्य देतात.

मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील लोकसंपर्का विषयी ते अतिशय संवेदनशील आहेत. आधी प्रदेशाध्यक्ष आणि आता मंत्री म्हणून त्यांना राज्यभर फिरावे लागते. त्यामुळे आपल्या लोकांकडे दुर्लक्ष होऊ नये, ही त्यांची प्रांजळ भावना असते. त्यामुळे मी आणि राजवर्धनने लोकांना भेटावे, त्यांच्या गरजा जाणून घ्याव्यात, लोकांचे प्रश्न सोडवावेत, यासाठी ते सतत सूचना करतात. पप्पा, राजवर्धन आणि आम्ही एकत्र दिवसाचे नियोजन करतो आणि बाहेर पडतो. पुन्हा एकत्र येतो तेव्हा कुणी काय म्हणाले, कुणाचे काय विषय होते आणि त्यावर काय करता येईल याविषयी चर्चा होते आणि त्यानुसार ते पुन्हा काही सूचना करतात. कितीही व्याप असले तरी आपले लोक दुर्लक्षित राहू नयेत, असा त्यांचा प्रयत्न असतो.

आपल्या भागातील उद्योग, व्यवसाय, बेकारी याविषयी ते सतर्क आहेत. आधीपासूनच ते सातत्याने भागात उद्योग, व्यवसाय वाढीस लागावेत यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या त्या 'थॉट प्रोसेस'मध्ये त्यांनी आता आम्हालाही सहभागी करून घेतले आहे. नवे बदल, आधुनिक तंत्रज्ञान याविषयी लोकांना माहिती मिळावी, प्रगती व्हावी अशा त्यांच्या सूचना असतात. इस्लामपूर परिसरातील उद्योजकांना एकत्र आणण्याचा माझ्या प्राथमिक प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले; पण त्यात सातत्य ठेवण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. नवीन उद्योजकांना एक नवे यशस्वी भविष्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

चांगले वाचक....

पप्पा चांगले वाचक आहेत. मोकळा वेळ वाया न घालवता त्या फावल्या वेळेचा ते वाचण्यासाठी सदुपयोग करतात. आम्ही काही चांगले वाचले तर ते पुस्तक त्यांना सुचवतो आणि त्यांना असे काही आवडले तर ते आम्हाला सुचवत असतात. दूरच्या प्रवासातही मिळणारा वेळ ते वाचण्यात घालवतात.

(शब्दांकन : धर्मवीर पाटील, इस्लामपूर)

loading image